टीम हॅलो महाराष्ट्र। अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.
अमेरिका आणि इराण हे दोन्ही तुल्यबळ देश आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या इशार्यातून केवळ धमक्या दिल्या नसून त्या खर्या करण्याची शक्यताही बळावताना दिसत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला पैसा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ केली असल्याने सोनेदर वाढतो आहे. सोने दराने सात वर्षांच्या उच्चांकी दराचा विक्रम स्थापित केला आहे. शेअर बाजारात अस्थिरता वाढल्याने गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. सोनेदरात सातत्याने वाढ होत असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या गुंतवणूकदारांकडून मागणी वाढतच राहणार आहे.
जोपर्यंत युध्दजन्य स्थिती आहे तोपर्यंत सोनेदरात तेजीच राहणार असल्याचा अंदाज अर्थ तज्ञांकडून वर्तविला जात आहे. ४२,००० ते ४५,००० पर्यंत सोनेदर पोहोचणार असून गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला तर सोन्याचा भाव कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असं झालं तर पुन्हा एकदा सराफांना मोठा दिलासा मिळणार आहे. चीन याबाबत सकारात्मक आहे. परंतु अजूनही तसा करार झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे.