ट्रम्प यांचा चीनला झटका! टिकटॉकला ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे दिले आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी ऍप कंपनी बाइटडान्सला पुन्हा एकदा दणका दिला आहे. येत्या ९० दिवसांत बाइटडान्सने टिकटॉकची संपत्ती विकण्याचा आदेश ट्रम्प यांनी दिला आहे. बाइटडान्समुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सबळ पुरावे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला ४५ दिवसांचा अल्टीमेटमही दिला होता. परंतु आता ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांमध्ये अमेरिकेतील आपली संपत्ती विकण्याचा आदेश दिला आहे. ज्याद्वारे कंपनी अमेरिकेत परिचालन करते ती संपत्ती विकण्याचे आदेश ट्रम्प यांनी बाईटडान्सला दिले आहेत.

“काही विश्वसनीय माहिती मिळाली असून चिनी कंपनी बाईटडान्स असं काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे,” असं ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसंच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे ऍप धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

याआधी मागील आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वीचॅटवर निर्बंध आणत आर्थिव व्यवहार करण्यास बंदी घातली होती. टिकटॉक आणि वीचॅट हे ऍप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला, परराष्ट्र धोरणाला आणि अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेत टिकटॉकचे १० कोटी युजर्स आहेत. अमेरिकेत टिकटॉक खरेदी करण्याबाबत बाइटडान्स आणि मायक्रोसॉफ्टमध्ये चर्चा सुरू आहे.

टिकटॉक मायक्रोसॉफ्ट अथवा इतर अमेरिकन कंपनीला विक्री करण्यासाठी ट्रम्प यांनी बाइटडान्सला १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्याबाबतच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीदेखील केली आहे. टिकटॉकसारख्या ‘अविश्वसनीय’ अॅपने डेटा, माहिती जमा करणे हे राष्ट्रीय सुरक्षतेसाठी धोका आहे. या माहितीच्या आधारे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडे अमेरिकन नागरिकांची खासगी माहिती जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. चीनकडून या खासगी माहितीचा दुरुपयोग होण्याची अधिक भीती असून कॉर्पोरेट हेरगिरी होण्याचा धोका संभावत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment