हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली, ज्यात ही घोषणा करण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याचसोबत यावर्षी IPL सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे.
भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये समालोचनाचं काम करणारा आकाश चोप्रा याने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापुढेही हाच निर्णय कायम ठेवा अशी मागणी आकाशने केली आहे.
याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय.