लंडन : वृत्तसंस्था – आयपीएल सुरू व्हायच्या आधी राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सने या अगोदर क्रिकेटमधून अनिश्चित काळासासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता जोफ्रा आर्चर वर्षभरासाठी क्रिकेटमधून बाहेर झाला आहे. जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताच्या कोपराची दुखापत पुन्हा बळावली आहे. मागच्या काही काळापासून आर्चरला कोपराच्या दुखापतीने सतावलं आहे. या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर दक्षिण आफ्रिका दौरा, भारत दौऱ्यातले काही सामने तसंच आयपीएलच्या काही सामन्यांना मुकला आहे.
यानंतर जोफ्रा आर्चर काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळताना दिसला होता. पण केंटविरुद्धच्या सामन्यात त्याला पुन्हा त्रास व्हायला सुरुवात झाली. यामुळे त्याने शेवटचे दोन दिवस बॉलिंग केली नाही. न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या सीरिजमधूनही तो आधीच बाहेर झाला होता. या दुखापतीमुळे तो काही काळ विश्रांती घेणार आहे.
‘मागच्या आठवड्यात जोफ्रा आर्चरच्या कोपराचं स्कॅनिंग करण्यात आलं. यामध्ये त्याच्या कोपराचं फ्रॅक्चर पुन्हा बळावलं आहे, यामुळे हे वर्ष क्रिकेट खेळणार नाही. भारताविरुद्धची सीरिज, टी-20 वर्ल्ड कप आणि वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ऍशेसमध्येही तो खेळणार नाही,’ असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘मे महिन्यामध्ये त्याच्या कोपरातून हाडाचा तुकटा काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर तो खेळासाठी मैदानात उतरला, पण त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. आर्चरवर झालेली शस्त्रक्रिया स्ट्रेस फ्रॅक्चरवरची नव्हती,’ असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.