IPL 2025 Postponed । क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने याबाबत घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. सर्व आयपीएल फ्रँचायझीशी सल्लामसलत केल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी हा मोठा धक्का आहे. आयपीएलचे अजूनही एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यानंतर काल किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कपिटल्स यांच्यातील धर्मशाळा येथील सामना (PBKS Vs DC) चालू स्थितीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका वरिष्ठ क्रिकेट अधिकाऱ्याच्या फोन कॉल नंतर सामना रद्द करण्यात आला. स्टेडियमचे लाईट टॉवर बंद करण्यात आले आणि मैदानातं अंधार करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्यास सांगितलं. तसेच दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब आपापल्या बसेसमध्ये चढून टीम हॉटेलमध्ये परतण्यास सांगण्यात आले. आता अधिक खबरदारी आणि खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन आयपीएल काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. (IPL 2025 Postponed)
25 मे रोजी कोलकाता येथे ही स्पर्धा संपणार होती- IPL 2025 Postponed
यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार होते, 25 मे रोजी कोलकाता येथे ही स्पर्धा संपणार होती. मात्र आता भारत पाकिस्तान युद्धामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली असून उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. यापूर्वी 2021 ला कोरोना काळात सुद्धा असच काहीसे घडलं होते. त्यावेळी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल मध्येच स्थगित केली होती. त्यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते.




