फलटण | आयपीएल क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे सट्टा व मटका घेतल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरुध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 95 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गांधी जयंतीदिनी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांधी जयंतीदिनी शनिवारी दि. 2 ऑक्टोबर रोजी बाबासाहेब मंदिरामागे पोलिसांनी छापा टाकला. या वेळी केवल हरिश्चंद्र वाघमारे (रा. मारवाड पेठ, फलटण), राकेश राजेंद्र तेली (रा. तेली गल्ली, फलटण), अमर अनिल पिसाळ (रा. बुधवार पेठ, फलटण), किशोर आनंदा घोलप व आदित्य अशोक शिंदे हे आयपीएल 2021 क्रिकेट मॅचवर मोबाईलद्वारे ग्राहकांची नावे व भाव घेऊन पैशाचे हार-जीत वर जुगार व सट्टा खेळताना तसेच मटका लोकांकडून रोख व मोबाईलद्वारे पैसे घेताना आढळून आले. या वेळी पोलिसांनी 5 हजार रुपयांची रोख रक्कम, 90 हजार रुपये किंमतीचे चार अँड्रॉईड मोबाईल, पेन, कॅल्क्युलेटर, चिठ्या व एक सॅक असा एकूण 95 हजार 665 रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सुजित मेंगावडे यांनी दाखल केली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक एस. के. राऊळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.