हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेकांना या दिवसात सुट्टी असते. उन्हाळ्याच्या या सुट्टीत कुठेतरी फिरायला जावं आणि आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालवावा असं प्रत्येकाला वाटतं. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारी जातात अथवा देवदर्शन करतात. आपल्या भारतात ७ ज्योतिर्लिंगाचे मोठे महत्व असून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी भेट देतात. तुम्ही सुद्धा सुट्यांच्या या दिवसात ७ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याच्या विचारात असाल तर भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज (IRCTC Tour Package) आणलं आहे.
IRCTC कडून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे ७ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा काढली जात आहे. हे टूर पॅकेज 22 मे 2024 ते 2 जून 2024 या कालावधीत 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी असेल. IRCTC च्या या टूर पॅकेजच्या (IRCTC Tour Package) माध्यमातून तुम्हाला ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, भेंट द्वारका, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे.
या ट्रेनच्या सीटिंग अरेंजमेंटबाबत सांगायचं झाल्यास, यामधील एकूण बर्थची संख्या 767 आहे, ज्यामध्ये 2 एसीच्या एकूण 49 सीट , 3 एसीच्या एकूण 70 सीट आणि स्लीपर कोचच्या एकूण 648 सीट्सचा समावेश आहे. तुम्हाला या टूर पॅकेजअंतर्गत प्रवास करायचा असेल तर ऋषिकेश, हरिद्वार, मुरादाबाद, बरेली, शाहजहानपूर, हरदोई, लखनौ, कानपूर, ओराई, वीरांगना लक्ष्मीबाई, ललितपूर रेल्वे स्थानकावरून सदर रेल्वे मध्ये बसावं लागेल. या टूर पॅकेजमध्ये ०२ एसी, ०३ एसी आणि स्लीपर क्लासचा प्रवास, नाश्ता आणि दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण, एसी/नॉन एसी बसमधून स्थानिक प्रेक्षणीय स्थळे तुम्हाला पाहता येतील.
भाडे किती? IRCTC Tour Package
स्टैंडर्ड श्रेणी अंतर्गत इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास) साठी प्रति व्यक्ती 22150 रुपये आणि 5-11 वर्षे वय असलेल्या लहान मुलांसाठी 20800 रुपये मोजावे लागतील. स्टँडर्ड क्लास (3AC वर्ग) साठी प्रति व्यक्तीं 36700 रुपये आणि लहान मुलांसाठी 35150 रुपये भाडे आहे. तर कम्फर्ट क्लास (2AC क्लास) मध्ये प्रति व्यक्ती 48600 रुपये आणि 5-11 वर्षे वय असलेल्या मुलांसाठी 46700 रुपये खर्च पडेल.