अभिनेता इरफान खान यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.

जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. मकबूल,  ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment