सांगली प्रतिनिधी। राज्याचे जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असून ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे या योजनांच्या पुर्ततेला आता गती येईल. जतच्या ४२ गावांचा प्रश्न मार्गी लागले, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजारामबापूंच्या पावलावर पाऊल ठेवून ते या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतो.
सदाभाऊ खोत यांच्यानंतर दुसऱ्यांदा जिल्ह्याला कृषि राज्यमंत्रीपदाची संधी विश्वजीत कदम यांच्या रुपाने मिळत आहे. त्यांच्याकडील कृषि व सहकार खात्याचा लाभ जिल्ह्यातील शेती व कारखानदारीला होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जयंत पाटील यांच्याकडे अनपेक्षितपणे जलसंपदा खाते आले अर्थात हे खाते शेतकऱ्यांच्या कायम संपर्काच्या संबंधीत असल्यामुळे यावरही जयंत पाटील ठसा उमटवतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. सलग ९ वेळा दमदारपणे अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम जयंत पाटील यांनी करुन दाखवला आहे. आता जलसंपदा म्हणजे पूर्वीचे पाटबंधारे खाते त्यांच्याकडे आल्यामुळे सिंचन प्रकल्पांना गती येईल, कारण जयंत पाटील यांचा संपर्क ग्रामीण भागाशी राहिलेला आहे.
सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ व वाकुर्डे या योजना पूर्णत्वाकडे गेलेल्या आहेत मात्र प्रत्येक योजनेचा अंतिम टप्पा अडचणीत आहे. यासाठी किमान पाच हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची आवश्यकता आहे. टेंभूचे पाणी खानापूर-आटपाडीच्या उर्वरित भागात, जतच्या शेवटच्या टप्प्यात व ४२ गावांना दिलासा देण्यासाठी म्हैसाळचा टप्पा गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. ताकारीचा अंतिम टप्पा देखील अपूर्ण आहे. वाकुर्डेचे बरेच काम अपूर्ण आहे या सर्वांकडे जातीने लक्ष घालून जयंत पाटील यांना ती पूर्ण करावी लागतील.