इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये धुसफूस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून गौरव नायकवडी तर शिवसेनेतून आनंदराव पवार या दोन नावावर वाळवा तालुका समन्वय समितीचे एकमत झाले आहे. या दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जो उमेदवार ठरवतील त्याचे प्रामाणिकपणे काम करू. आत-बाहेर करणार नसल्याची ग्वाही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. इस्लामपूर येथे वाळवा तालुका समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेेचे संचालक सी.बी.पाटील, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, वाळवा पं.स.चे गटनेते राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, नगरसेवक बाबासो सुर्यवंशी, विक्रम पाटील, सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सदाभाऊ म्हणाले, तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र आणून वज्रमूठ बांधणार आहे. आम्हाला आवडते-नावडते कोणीही नाही. विरोधी परंपरेतील दोन युवा नेत्यांची नावे समोर आली आहेत. आम्ही शेत नांगरल, बांधबंदिस्त केलं, पेरणी केली, पिक जोमात आलयं, सर्वत्र आनंद आहे, त्यामुळे कुणाच्या वाटयाला रान देणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून वाळवा तालुक्यात विकासाला चालना दिली. रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, पर्यटनस्थळ विकास, इस्लामपूर शहरातील भूयारी गटारचे काम सुरू आहे. तीन वर्षांच्या मंत्रीपदाच्या काळात विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गौरव नायकवडी हे मनमिळाऊ, नम्रता व आदर राखणारे युवा नेते आहेत. तर शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी नगरपालिका निवडणूकीत सिंहाचा वाटा उचलला असे हि ते म्हणाले.

दरम्यान विरोधी गटाच्या बैठकीत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता भिमराव माने यांनी ते दौर्‍यात आहेत. पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी ते एकनिष्ठ राहतील असे सांगितले. नगराध्यक्ष पाटील यांना विचारले असता बैठकीचा कोणताही निरोप आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधी सर्वपक्षीय विकास आघाडीत अजूनही धुसफूस असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment