हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संशोधन क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असून भारताने वेगवेगळे प्रयोग करून अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यातच आता इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गगनयान आणि चांद्रयान मोहिमांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत 2026 मध्ये गगनयान मिशन अवकाशात पाठवणार आहे, तर चांद्रयान 4 मिशन 2028 मध्ये प्रक्षेपित करणार आहेत. सध्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 2 टक्के असून, येत्या दहा वर्षांत हा वाटा 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट इस्रोने डोळ्यासमोर ठेवले आहे.
2040 चे उद्दिष्ट
भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रकल्प मिशन NISAR 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच जपानच्या अवकाश संस्थेसोबत LUPEX नावाच्या मिशनसाठी इस्रो काम करणार आहे, ज्याला चांद्रयान 5 असे म्हणता येईल. या मिशनसाठी भारत लेंडर देणार आहे आणि जपान रोव्हर तयार करणार आहे . चांद्रयान 5 मधील रोव्हर 350 हे किलो वजनाचे असणार आहे , जे चांद्रयान 3 मधील रोव्हरपेक्षा खूप मोठा आणि जाड असेल. चांद्रयान 3 रोव्हरचे वजन केवळ 27 किलो होते. या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करणे असून , भारताचे उद्दिष्ट 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे आहे.
भारत संशोधनात आघाडीवर
इस्रोचे अध्यक्ष यांनी चांद्रयान 3 च्या यशा बद्दल बोलताना सांगितले की, या मिशनने केवळ चंद्रावर सॉफ्ट लैंडिंगच केले नाही, तर चंद्राबद्दल मनोरंजक आणि महत्त्वाची माहिती देखील पाठवली आहे. चांद्रयान 1 च्या यशस्वी मोहिमेप्रमाणे, ज्याने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे उघड केले, त्याचप्रमाणे चांद्रयान 3 ने देखील चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती समोर आणली आहेत. इस्रोच्या या यशस्वी मोहिमांमुळे भारत अवकाश संशोधनात आघाडीवर येत असून भविष्यातील अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा असेल.