रायगडावर येण्याची संधी मिळणं आणि छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होणं ही अभिमानाची बाब- राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढं नतमस्तक होणं ही प्रत्येक भारतीयांसाठी गौरव आणि अभिमानाची बाब आहे. रायगडावर येण्याची संधी मिळणं हे माझं सौभाग्य समजतो, अशा शब्दांत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्यावर भेट दिली. राष्ट्रपतींसोबत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मान्यवर उपस्थित होते.

तब्बल चार तास राष्ट्रपती रायगडावर होते. या दरम्यान त्यांनी होळीचा माळ, राजसदर, जगदीश्वराचे मंदिर, छत्रपतींची समाधी आणि रायगड संवर्धनाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली. किल्ले रायगडावरील राजसदरात असलेल्या राज सिंहासनाधिष्ठित महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रपतींनी अभिवादन केले. तसेच अतिशय आत्मीयतेने सर्व इतिहास जाणून घेतला.

दरम्यान, यावेळी रायगड प्राधिकरणामार्फत राष्ट्रपतींना चांदीची तलवार, महाराजांच्या काळातील सोन्याचे होन, महाराजांच्या काळातील कमरेला बांधायचा पट्टा आणि आज्ञापत्र भेट म्हणून देण्यात आले. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपतींच्या संग्रहालयात जतन करून ठेवणार असल्याचे राष्ट्रपतींनी संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले.

You might also like