औरंगाबाद : धावत्या रेल्वेच्या रुळाच्या बाजूला उभे राहून रेल्वेसोबत व्हिडिओ तयार करण्याच्या नादात सोहेल महेबुब शेख वय (21) गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
सोहेल हा आई वडील व लहान भावा सोबत चिकलठाण्यातील पटेल घरात राहत होता. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपनीत त्याला काम मिळाले होते. चिकलठाण्यातील काही तरुण मागील अनेक दिवसापासून आसपासच्या परिसरात छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी जात होते. मंगळवारी काही मित्रांनी सोहेलला बोलावले दुपारी साडेचारच्या सुमारास आईला लगेच येतो असे सांगून मित्रासोबत चिकलठाणा रेल्वेस्थानकावर गेला. तेथे काही मित्र व्हिडिओ तयार करत होते. सोहेलला देखील रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आधी रेल्वे फलाटावर फोटो काढून नंतर रेल्वे रुळाजवळ जाऊन व्हिडीओ, छायाचित्र काढू लागला. मात्र अचानक वेगाने आलेल्या मालगाडीची त्याला धडक बसली. त्यात तो बाजूला फेकला गेला. रेल्वे रूळावर सेल्फी काढत असताना धडक लागली, अशी नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रेल्वेची धडक बसल्यानंतर सोहेलच्या डोक्याला व शरीराच्या एका बाजूला गंभीर मार लागला होता. त्याचा मोबाईल बाजूला पडला. जखमी अवस्थेतही पटकन मामाला सांग असे तो म्हणाला. त्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्रकृती गंभीर झाली. घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. बुधवारी शवविच्छेदन करून त्याचे पार्थिव कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.
तरुणांमधील क्रेझ ठरताहेत जीवघेणे :
सध्या सोशल मीडियावरती ॲक्टिव राहण्यासाठी फॉलोवर्स आणि लाईक वाढवण्यासाठी तरुणवर्ग काहीही करताना दिसत आहेत. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, रिल्स यावरती व्हिडिओ आणि फोटोंचा मोठा ट्रेंड आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अनेक तरुण जीवघेणे प्रकार करत आहेत. धावत्या रेल्वे सोबत पळून स्लो-मोशनमध्ये व्हिडिओ तयार करणे, रेल्वे रुळावर छायाचित्र काढणे असे प्रकार देखील सुरू आहेत.