जय शिवराय ! किल्ले वसंतगडावर चुन्याचा घाणा 350 वर्षानंतर सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वसंतगडावरील ऐतिहासिक चुन्याचा घाणा तब्बल 350 वर्षानंतर सुरू झाला. किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी रविवारी घाण्याला बैलजोडी जुंपून हा घाणा सुरू करत बांधकाम साहित्याची मळणी करण्यात आली. त्यामुळे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला.

कराड जवळील किल्ले वसंतगडावर टीम वसंतगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून ऑगस्ट 2020 मध्ये ढासळलेल्या तटबंदीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी दि. 27 नोव्हेंबर रोजी कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे आणि तळबीड गावचे सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते पूजन करून या शिवस्वराज्य कार्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वराज्यकार्य टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे, शिलेदार, दुर्गसेवक यांच्यासह तळबीड, वसंतगड व परिसरातील शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.

माझ्या थोरल्या व धाकल्या धन्याचे चरण कमल ज्या-ज्या ठिकाणी पडले. तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा, हा एकच ध्यास घेत स्वराज्यकार्य टीम वसंतगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळे आणि शिलेदारांनी स्वराज्यकार्य
आरंभिले आहे. त्यानुसार वसंतगडाच्या पश्चिम दरवाजा जवळील ढासळलेल्या तटबंदीची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा रविवारी प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.

वसंतगडावरील चुन्याच्या घाणीला बैलजोडी जुंपून या घाण्यात शिवकाळात बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या उडीद डाळ, काळा गूळ, चुना, रेती यासह विविध प्रकारच्या साहित्याची मळणीही करण्यात आली. तब्बल 350 वर्षांनंतर स्वराज्यातील एखाद्या किल्यावर ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन चुन्याचा घाणा सुरू करण्याची ही महाराष्ट्रातील बहुदा पहिलीच वेळ आहे. या घटनेने साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या शिवकालीन वास्तुकलेला उजाळा मिळाला असून हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवताना गडावरील मातीही थरथरली असेल, अश्या भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाल्याचे मत स्वराज्यकार्य टीम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवक, मावळे, शिलेदारांनी व्यक्त केले.

दरम्यान, किल्ले वसंतगडावर प्रत्येक रविवारी दुर्गसंवर्धनाचे काम करण्यात येत असून तळबीड, वसंतगड व परिसरासह तालुका आणि जिल्ह्यातील शिवप्रेमी, दुर्गसंवर्धन, संरक्षण करणाऱ्या मावळे, शिलेदार, दुर्गसेवकांनी या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही स्वराज्यकार्य टिम वसंतगड व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळे, शिलेदार, दुर्गसेवक यांच्याकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रहिताच्या कार्यास अर्थिक व वस्तू स्वरूपात सहकार्य करावे

ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंना छ. शिवाजी महाराज व स्वराज्याचा मावळ्याचा स्पर्श झाला आहे. त्यामुळे इतिहासाची जपणूक होण्यासाठी आमचे कार्य लोकांच्या सहभागातून सुरू आहे. आता वसंतगडावरील 35 फूट रूंद व 10 फूट उंचीच्या तटबंदीचे काम सुरू असून त्याला 10 लाख रूपये खर्च आहे. तरी लोकांनी राष्ट्रहिताच्या कार्यास अर्थिक तसेच वस्तू स्वरूपात सहकार्य करावे.

दत्तात्रय जामदार, टीम वसंतगड, दुर्गसेवक

Leave a Comment