सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र विधानसभा २०१९ ची निवडणूक अनेक अंगांनी खास ठरली. प्रचार सुरू असताना तेल लावलेला पैलवान, आखाडा असे अनेक शब्द ऐकायला मिळत होते. राज्याचं राजकारण हे जर कुस्तीचा फड असेल तर आपणच या फडाचे वस्ताद असल्याचं शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. मात्र पैलवान स्टाईल विजय साजरा करून जयकुमार गोरे यांनी माण खटावचे राजे आपणच असणार असल्याचं सिद्ध केलं आहे. जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले होते.
आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या या गटामध्ये प्रभाकर देशमुख, दिलीप येळगावकर, रणजित देशमुख, संदीप मांडवे, अनिल देसाई यांचा समावेश होता. या सगळ्यांनी एकत्र येऊनसुद्धा जयकुमार गोरे यांचा वारू ते रोखू शकले नाहीत. जयकुमार गोरे भाजपमध्ये गेल्याचा त्यांना फटका बसेल असं वाटत होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेना पक्षातर्फे निवडणूक लढवली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिव पोळ यांचा गड उध्वस्त करून जयकुमार गोरे यांनी १० वर्षांपूर्वी माण-खटाव काबीज केलं होतं. आज या निकालाने जयाभाऊंना चॅलेंज नसल्याचं स्पष्ट झालं आहे.