नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांना कावीळ आजाराने बऱ्याच दिवसांपासून ग्रासले होते. तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनासाठी प्रसिद्ध होते.आपल्या प्रवचनातून राष्ट्रवाद आणि मानवतावाद सर्वदूर पेरणारे संतमुनी म्हणून त्यांची ख्याती होती.
तरुण सागर हे गेल्या काही दिवसापासून कावीळ आजाराने बाधित होते. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. त्यामुळे त्यांनी जैन धर्मात पवित्र मानला जाणारा संतरा घेण्याचे ठरवले. “संतरा म्हणजे मृत्य समीप आल्याचे समजताच अन्न पाण्याचा त्याग करणे.” या विधीला जैन धर्मात अत्यंत पवित्र विधी मानले जाते. त्या विधी नुसार तरुण सागर यांची प्राणज्योत आज पहाटे मालवली. आज दुपारी तीन वाजता दिल्ली पासून २८ किमी दुर तरुणसागर तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. “रामायणाची सीता आणि महाभारताची गीता ही या देशाची खरी संस्कृती आहे.” अशा प्रकारचे अनेक विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून दिले आहेत. मानवतावाद आणि राष्ट्रवाद यावर सखोल विचार आपल्या प्रवचनातून ते देत असत. तरुण सागर यांचे खरे नाव पवन कुमार जैन असे होते. १९६७ साली गुहुजी गावी जन्मलेल्या तरुण सागर यांनी १९८१ साली घर सोडले. त्यांनी जैन धर्माचे मुनी होण्याचा निर्णय घेतला. जैन मुनी झाल्या पासून अल्पावधीतच त्यांच्या अमोघ वाणीतून ते प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचले. त्यांना २००२ मध्ये मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्री दर्जा देऊन सन्मानित केले होते. तरुण सागर यांच्या जाण्याने जैन धर्मीयांवर शोककळा पसरली आहे.