चोपडानजीक दोन तर चाळीसगावमध्ये एक अपघात
तीन अपघातात ६ जण किरकोळ जखमी
जळगाव प्रतिनिधी
चोपडा येथे शहराच्या गावाबाहेरील धरणगाव चौफुलीवर गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास निमगव्हाणकडे बर्फ घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलीने (क्रमांक सी.जी.०४ जे डी ३८९५) जोरदार धडक दिली. यात जोरदार आवाज होऊन मालवाहू रिक्षा रस्ताच्या कडेला फेकली जाऊन रिक्षात बसलेला मजूर भूपेंद्रसिंग लेखराम बाथम (वय १८) हा तरुण जागीच ठार झाला. त्याच्या सोबत गाडीत बसलेला पंकज अजयपाल कश्यप हा तरुण गंभीर जखमी झाला आहे तर अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर ट्रॉला चालकाने शिरपूरकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी पाठलाग करून शिरपूर बायपास रोडवर पकडून चालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी मालवाहू रिक्षाचालक जगदीश कोळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.
दरम्यान दुसऱ्या एका अपघातात वैजापूर रस्त्यावर तेल्या घाटात वळणावर खासगी प्रवासी वाहतूक करणाºया चारचाकी वाहनातून (एम.एच.१५, के.३००८) फेकल्या गेल्याने चालकाच्या मागे बसलेला चोपडा येथील साने गुरुजी वसाहतीतील रहिवासी पिंटू चिंतामन भोई (३८) जागीच ठार झाले. जिल्ह्यातील आणखी एका अपघातात चाळीसगावनजीक मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बंडू बाबुलाल गायकवाड (वय ३३, रा.पातोंडा ता.चाळीसगाव) हा मजूर जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे ५.३० वाजता धुळे रोडवरील हनुमान मंदिरासमोर घडला. मयत बंडू हा चाळीसगाव येथील आनंदवाडीत सासरवाडीला मुक्कामी आला होता.