जामनेर ते मुक्ताईनगर… जळगावात भाजप- शिवसेनेच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव.. आणि जळगावचं राजकारण.. म्हणजे जाळ अन् थुर संगटच.. गिरीश महाजन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांसारखी राजकीय मंडळीच्या राजकारणाचा पायाच जळगावात पक्का झाला… अनेक अटीतटीच्या लढती याच जळगावात आपल्याला पाहायला मिळतात… भाजपचे संकटमोचक याच जिल्ह्यात असल्याने येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे.. तर दुसरीकडे मशाल आणि तुतारीलाही जिल्ह्यात मोठा साॅफ्ट कॉर्नर मिळतोय.. त्यामुळे जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत काय होईल? भाजप, तुतारी की मशाल, जळगावात आमदारकीला कोण भाव खाऊन जातंय? त्याचाच घेतलेला हा आढावा..

यातला पहीला मतदारसंघ पाहुयात तो जामनेरचा… भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन या मतदारसंघाचे बाहुबली आमदार आहेत, असं म्हणायला हरकत नाहीत… याच मतदारसंघातून ते १९९५ पासून सलग निवडून येतायत.. अनेक विरोधक आले, गेले पम आमदार कायम राहीले, गिरीशभाऊ… याच जामनेरच्या आमदारकीच्या जीवावर ते मंत्री झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात उठबस वाढली.. एवढंच नाही तर फडणवीसांच्या खास मर्जीतले संकटमोटक म्हणून नावारुपास आले… पण याच संकटमोचकाला जामनेरमध्ये घेरण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने आखलाय… २०१९ ला राष्ट्रवादीच्या संजय गरुड यांनी महाजनांना फाईट दिली होती पण तेच भाजपमध्ये आल्याने आता शरद पवारांच्या तुतारीकडे तीन पर्याय आहेत… एक म्हणजे २०१४ ला राष्ट्रवादी पार्टीकडून लढत दिलेले दिगंबर पाटील.. दुसरे म्हणजे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दिलीप खोडपे आणि तिसरं नाव म्हणजे अजितदादा गटात असणाऱ्या २००४ पासून विधानसभेचा तयारी करणाऱ्या पण प्रत्येक वेळेस डावलण्यात आलेल्या बंगालसिंह चितोडीया यांचं… राष्ट्रवादीनं या तिन्ही नावांचा मध्यंतरी नुकताच सर्वे केला असून जो कुणी महाजनांना चितपच करु शकतो त्याच्या हातात शरद पवारांची तुतारी येईल, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळतेय..

YouTube video player

दुसरा मतदारसंघ आहे चोपड्याचा… शिवसेना शिंदे गटा असणाऱ्या लता सोनवणे या चोपड्याच्या विद्यमान आमदार. जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या घरकुल घोटाळ्या प्रकरणात नाव आल्यानं चंद्रकांत सोनवणे यांना २०१९ ची निवडणूक लढवता आली नव्हती, त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार लता सोनवणे यांनी निवडणुक लढवत राष्ट्रवादीचे जगदीश वळवी यांच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढत दिली होती… पण घरकुल प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानं चंद्रकांत सोनवणेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाकडून ते उमेदवार असतील ते कन्फर्म आहे… त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चंद्रकांत बारेला हे इच्छुक आहेत… तर सध्या अजित पवार गटात असणारे माजी आमदार जगदीश वळवी हे निवडणुकीच्या तोंडावर तुतारी फुंकण्याची दाट शक्यता आहे… त्यांचाही जनाधार मोठा असल्याने आघाडी त्यांच्या नावाचा विचार करु शकते…

तिसरा मतदारसंघ येतो तो रावेरचा…काँग्रेसचे शिरीष चौधरी रावेरचे विद्यमान आमदार.. त्यांच्या विरोधात भाजपकडून लढत दिलेले हरिभाऊ जावळे यांचे निधन झाल्यानं महायुतीकडून या जागेसाठी इच्छुकांची गर्दी वाढलेय… मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन करण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या या मतदारसंघात २००९ मध्ये गिरीश चौधरी यांनी अपक्ष निवडणुक लढली होती… मात्र २०१४ मध्ये भाजपच्या हरिभाऊ जावळे यांनी त्यांचा पराभव करत मतदारसंघावर पकड बनवली… पुन्हा २०१९ मध्ये काँग्रेसकडून चौधरींनी निवडणुक लढवत भाजपला चितपट केलं… येणाऱ्या निवडणुकीतही शिरीष चौैधरी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून लढण्याऐवजी आपला मुलगा धनंजय चौधरी याला लाँच करु पाहतायत… पण याला कितपत यश येईल हा नव्या संशोधनाचा विषय. बाकी प्रहारच्या अनिल चौधरींचीही मतदारसंघात चांगली ताकद आहे. पण आघाडी सध्यातरी या मतदारसंघात प्लसमध्ये दिसतेय…

चौथा मतदारसंघ आहे तो भुसावळचा… २००९ च्या पुनर्चनेनंतर अनुसुचित जातींसाठी राखिव झालेला हा मतदारसंघ.. भाजपचे संजय सावकारे इथले विद्यमान आमदार. भुसावळच्या आमदारकीला उमेदवार कोणतेही असेना पण इथे मुख्य लढत असते ती गिरीश महाजन गट विरुद्ध एकनाथ खडसे गट अशी… संजय सावकारे हे खडसे गटाचे मानले जातात… त्यामुळे खडसे यांनी पुन्हा भाजपवापसी केल्यामुळे सावकारेंच्याच नावावर महायुतीकडून पुन्हा शिक्कामोर्तब होणारय , हे जवळपास कन्फर्मय. लेवा पाटील समाजाचं मतदारसंघातील असणारं वर्चस्व पाहता यंदाही ते आमदारकीचा गुलाल लावतील, असं बोललं जातंय… पाचवा मतदारसंघ पाहुयात तो जळगाव शहरचा… भाजपचे सुरेश भोळे इथले विद्यमान आमदार… सलग दोन टर्म ते भाजपकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतायत…मात्र रखडलेली विकासकामं आणि एन्टीइन्कबन्सीचा फटका त्यांना यावेळी बसू शकतो, असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलंय. जळगाव शहरच्या माजी महापौर जयश्री महाजन या मशालीच्या चिन्हावर भोळेंच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे… त्यामुळे भोळे विरुद्ध महाजन अशी लढत झालीच तर निकालात जयश्री महाजन भाजपला पराभवाचा धक्का देतील, असं मतदारसंघात बोललं जात आहे…

सहावा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीणचा… शिवसेना शिंदे गटाचे पहिल्या फळीतील नेते गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ… जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यात गुलाबराव पाटलांना यश मिळालं… खरंतर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा पारंपारिक सामना रंगत असून या दोघाही नेत्यांचा ग्रामीणवर चांगला होल्ड आहे… महायुतीत यंदाही ही जागा शिवसेना शिंदे गटातील उमेदवार गुलाबराव पाटील हेच उमेदवार असतील.. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटणार, यावर इथली बरीच समीकरण आहेत सध्या शिवसेना ठाकरे गटातील गुलाबराव वाघ यांच्या नावाची आमदारकीसाठी चर्चा आहे.. तर दुसरीकडे शरद पवार गटातील गुलाबराव देवकर हे देखील पाटलांच्या विरोधात शड्डू ठोकू शकतात.. आघाडीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी फेस टू फेस लढत घेण्याचा निर्णय झालाच. तर देवकरांकडे मशालीच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याचा ऑप्शन असू शकतो.. पण गुलाबराव वाघ यांचा नेमका काय स्टँड असेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे… बाकी अँन्टीइन्कबन्सी, शिवसेनेतील बंडखोरीला साथ आणि ठाकरे – पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वातावरण या सगळ्यांचा विचार करता यंदा गुलाबराव पाटील यांना पराभवाचा धक्का बसू शकतो…

सातवा मतदारसंघ येतो तो अमळनेरचा… राष्ट्रवादी अजित पवार गटात असणारे अनिल पाटील हे सध्या अमळनेरचे विद्यमान आमदार. भाजपच्या शिरीष चौधरी यांचा पराभव करत त्यांनी २०१९ ची निवडणूक जिंकली होती. अमळनेर मतदारसंघाला स्वत: चा असा ऐतिहासिक व सामाजिक वारसा लाभला आहे… साने् गुरुजींचं वास्तव्य असो, मंगळग्रह मंदिर असो वा विप्रो सारखी कंपनी अमळनेर प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला भुरळ घालतो… दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहे… २००९ ला आयत्या वेळी उमेदवारी दाखल करून अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांंनी गुलाल उधळला.. २०१४ ला शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले… पण २०१९ ल चौधरी यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवूनही जनतेनं परेंपरेप्रमाणे निकाल फिरवला आणि निकाल राष्टवादीच्या अनिल पाटील यांच्या बाजूने लागला. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनाच सुटण्याची शक्यता जास्त आहे.. तर माजी आमदार बी. एस. पाटील हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी शरद पवार गचात प्रवे्शळ केल्यामुळे इथं अजितदादांचं चांगलंच टेन्शन वाढणार असल्याचं सध्यातरी दिसतंय… यासोबत शिरिश चौधरीही शरद पवार गटाच्या संपर्कात असून तिकीट कुणाला सुटणार, यावर इथली लढत आणखीन स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत…

आठवा मतदारसंघ येतो पाचोरा विधानसभेचा.. समाजवादी , प्रजासमाजवादी आणि काँग्रेस पक्षांचा विचारांचा पगडा असलेल्या पाचोरा मतदारसंघ. निवडणुकीमध्ये सातत्याने एकाच पक्षाला कधीही साथ न देणारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख. 2014 च्या निवडणुकीत मोदींचा देशभर झंझावात असताना मतदारसंघाने भाजप उमेदवाराला झिडकारत शिवसेना उमेदवार किशोर पाटील यांना निवडून देत भाजपाला धक्का दिला. पुढे युतीच्या काळात राष्ट्रवादीच्या दिलीप वाघ यांचा पराभव करत किशोर पाटील सलग दुसऱ्यांदा पारोऱ्यातून निवडून आले…सध्या ते शिवसेना शिंदे गटात असल्याने त्यांच्याविरोधात आघाडी मास्टरस्ट्रोक खेळू शकते. तो म्हणजे आर. वो. तात्यासाहेब यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी कन्फर्म समजली जातेय… निर्मल सिड्स उद्योगच्या माध्यमातून तालुक्यात त्यांनी बरीच रोजगारनिर्मिती केली आहे.. त्यामुळे पाचोऱ्यातही येणाऱ्या विधानसभेला गद्दार विरुद्ध खुद्दार असा अटीतटीचा संघर्ष पहायला मिळू शकतो..

नववा मतदारसंघ आहे तो हायव्होल्टेज मुक्ताईनगरचा…

एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला. खडसेचं राजकारण वाढलं, रुजलं ते याच मतदारसंघात.. तब्बल सहा टर्म प्रतिनीधीत्व केलेल्य याच नाथाभाऊंना मुक्ताईनगरचं तिकीच मिळेल का, अशी परिस्थिती २०१९ मध्ये उद्भवली होती.. पण पक्षातला विरोध पाहता त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरची उमेदवारी मिळवून दिली.. भाजप – शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडाळी करत अपक्ष लढत लढवली होती… पण नाथाभाऊंच्या राजकारणाला शह देण्यासाठी पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेकांनी रसद पुरवून अपक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणलं… रोहिणी खडसे म्हणजेच एका अर्थाने नाथाभाऊंचा मुक्ताईनगरमध्ये झालेला पराभवाने खडसेंचा बालेकिल्ला ढासळला.. यानंतर त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि पुन्हा त्यांची घरवापसी हा गेलाबाजार इतिहास आपल्याला माहित असेलच. सध्या विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटात असल्याने् त्यांची महायुतीकडून उमेदवारी कन्फर्म समजली जातेय… तर रोहिणी खडसे यांची उमेदवारी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधीच जाहीर केल्यानं रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा इथला अटीतटीचा सामना आपल्याला पहायला मिळू शकतो… नाथाभाऊ यांच्यासाठी मात्र पक्ष की मुलगी, असा बाका प्रसंग मुक्ताईनगरच्या निम्मिताने निर्माण झालाय…

दहावा मतदारसंघ आहे चाळीसगावचा…

गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे भाजपचे मंगेश चव्हाण हे सध्या चाळीसगावचे विद्यमान आमदार आहेत… चव्हाणांना काटशाह देण्यासाठी शरद पवार गटाच्या राजीव देशमुख यांचाही पर्याय महाविकास आघाडीकडे असला तरी त्यांच्या तब्येतीचं कारण पाहता ते निवडणूक लढण्याची शक्यता तशी कमी आहे… त्यामुळे उन्मेश पवार येणाऱ्या विधानसभेला मशालीच्या चिन्हावर चाळीसगावची आमदारकी लढवू शकतात. मंगेश चव्हाण वर्सेस उन्मेश पवार हे दोन कट्टर नेते एकमेकांना भिडल्यास चाळीसगावचा निकाल कुठे झुकेल, हे आत्ताच सांगता येत नाही…अकरावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो पारोळ्याचा… राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांचा पराभव करत शिवसेनेचे चिमणराव पाटील गेल्या विधानसभेला किंगमेकर ठरले.. अर्थात गिरीश महाजन एन्ड कंपनीच्या प्रयत्नांनी सतीश पाटलांचा हा पराभव झाल्याचं बोललं गेलं… मात्र यंदाच्या विधानसभेला चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे महायुतीकडून इच्छुक आहेत… तर त्यांच्या विरोधात सतिश पाटील हे महाविकास आघाडीकडून कडवी झुंज देतील. यंदा पारोळ्यात वारं आघाडीच्या बाजूला असल्याचं सध्यातरी पहायला मिळतंय..तर हे आहेत जळगाव जिल्ह्यातील हायव्होल्टेज ११ विधानसभा मतदारसंघांचा संभाव्य निकाल..