शुभम भोकरे ।
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात तीन घटना ठळक आहेत. जालियनवाला बाग हत्याकांड , मिठाचा सत्याग्रह आणि छोडो भारत चळवळ. या तीन घटनांनी त्या त्या वेळी या लढ्याला नवे वळण दिले. 101 वर्षांपूर्वी अमृतसर शहरात घडलेल्या निर्घृण जालियनवाला बाग हत्याकांडाने भारतीय जनता स्वातंत्र्यसाठी जागृत झाली.
१३ एप्रिल १९१९ . सूर्यास्ताच्या वेळेस ब्रिगेडियर-जनरल डायरने ५० जणांची फौज आणि दोन सशस्त्र लष्करी वाहने – ज्यात मशीनगन्स तैनात होत्या – घेऊन जालियानवाला बागेत प्रवेश केला. प्रवेशद्वार अरुंद असल्याने सशस्त्र वाहने आत शिरू शकली नाहीत. डायरने सैनिकांना प्रवेशद्वारापासून जवळ मैदानाच्या डाव्या व उजव्या बाजूला एका रांगेत तैनात करून त्यांना रायफली सज्ज करण्याचा आदेश दिला. डायरच्या फौजेत गुरखा, शीख व बलुची सैनिक होते. मैदानात सत्याग्रहींची तीन दिवसांपूर्वीच्या ब्रिटीशांच्या अत्याचारी वर्तणुकीचा निषेध करणारी सभा सुरु होती. सभेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. तो ‘ बैसाखी’ चा दिवस होता. सुवर्ण मंदिराच्या पवित्र तळ्यात स्नान करण्यासाठी, तसेच या दिवशी परंपरेने जवळच्याच गोविंदगढ किल्ल्याजवळ भरणाऱ्या गुरांच्या बाजारासाठी आसपासच्या परिसरातून आलेले अनेक लोक मैदानात विश्रांती घेत वक्त्यांची भाषणे ऐकत होते. वेगवेगळ्या अंदाजांनुसार सुमारे १५ ते २० हजार लोक मैदानात होते. ते निःशस्त्र होते. निरपराध होते. डायरने लोकांना कोणताही इशारा दिला नाही. सभा बेकायदा असल्याचे घोषित केले नाही. लोकांना शांतपणे निघून जाण्याची सूचना दिली नाही. त्याने सैनिकांना थेट गोळीबाराचा आदेश दिला आणि लष्करी कौशल्याने रायफली धडधडू लागल्या. मैदानात गोंधळ उडाला. हा हल्ला अनपेक्षित होता. जीवाच्या भीतीने लोक धावत सुटले. पण जाणार कोठे ? मैदानाच्या चारही बाजूंना तटबंदी होती. एकुलता एक अरुंद मार्ग होता आणि तिथून गोळ्यांचा भडीमार सुरु होता. परिणामी असंख्य लोक मृत्युमुखी पडले.असंख्य जायबंदी झाले. कित्येकांनी मैदानातल्या खोल विहिरीत उड्या टाकल्या. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. या दुर्दैवी दिवशी निरपराध आणि निःशस्त्र जमावावर १६०० गोळ्यांची बरसात झाली. सतत दहा मिनिटे गोळीबार चालू होता. गोळ्यांचा साठा संपला तेव्हाच गोळीबार थांबला.
थोडं याची पार्श्वभूमी बघू !
तत्कालीन ब्रिटिश मंत्रीमंडळातील भारतमंत्री ई. एस. माँटेग्यू आणि भारताचे व्हाईसराय लॉर्ड चेल्म्सफोर्ड यांनी भारतीयांना राज्यकारभारात टप्प्याटप्प्याने सामावून घेत ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची उदार योजना जाहीर केली होती. त्याचवेळी याच्या उलट “रौलट कायदा” मंजूर करण्यात आला. यामध्ये विना चौकशी अटक करब्याचा कायदा संमत केला. यातून ब्रिटिशांचा स्पष्ट हेतू दिसत होता.गांधीजींच्या सत्याग्रहाचा पहिला देशव्यापी प्रयोग रौलट कायद्याच्या विरोधात झाला. ६ एप्रिल १९१९ या दिवशी देशभरात हरताळ पाळण्यात आला.
अमृतसरमधील सत्याग्रहात डॉ. सैफुद्दीन किचलू व डॉ. सत्यपाल यांचा पुढाकार होता. या नेत्यांना १० एप्रिल रोजी अटक केली. त्यामुळे शहरात अस्वस्थता पसरली. त्त्यात पंजाबमध्ये प्रवेश करताना गांधींना अटक झाल्याच्या बातमीची भर पडली. या कारवाईचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने निघालेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला, परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या भीतीने नागरी प्रशासनाने सूत्रे लष्कराच्या हाती दिली. १२ एप्रिलला शहर डायरच्या नियंत्रणाखाली आले. तरीही जालियानवाला बागेत अहिंसक सत्याग्रही सभेसाठी जमले होते. असे दुःसाहस करणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या व त्याद्वारे संपूर्ण पंजाबात दहशत निर्माण करण्याच्या इराद्यानेच डायरने त्याच्या अधिकाराच्या कक्षा ओलांडून मोठे हत्याकांड घडवले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”




