जालना- औरंगाबादमध्ये आयकर विभागाची छापेमारी ! तब्बल 300 कोटींची मालमत्ता जप्त

औरंगाबाद – जालना आणि औरंगाबादमधील स्टिल कंपनी री रोलिंग मीलवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामध्ये 300 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जालना आणि औरंगाबादमध्ये 32 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. 23 सप्टेंबर रोजी आयकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे औरंगाबाद आणि जालनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील प्रमुख कंपन्या सध्या ईडीच्या रडारावर आहेत.

महाराष्ट्रातील 4 प्रमुख स्टील री रोलिंग मिलवर आयकर विभागाकडून 23 सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकातामध्ये पसरलेल्या 32 हून अधिक परिसरात ईडीने छापेमारी केली. या छापेमारीमध्ये आयकर विभागाकडून आक्षेपार्ह कागदपत्र, सैलपत्रके आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. तसेच 300 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने प्रेस रिलिज मधून दिली आहे.

शेल कंपन्या वापरून शेअर प्रीमियम आणि असुरक्षित कर्जाच्या वेषात कंपन्यांनी मिळवलेले बेहिशेबी उत्पन्न समोर आले आहे. यात 300 कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी खरेदीचे पुरावे आयकर विभागाला सापडले आहेत. कंपन्यांच्या कारखाना परिसरातही मोठ्या प्रमाणात बेहिशेबी साठा सापडल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. या छापेमारीत आयकर विभागाला 12 बँक लॉकर्स सापडले आहेत. 2.10 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि दागिने, 1.07 कोटी रुपयांचे दागिनेही आयकर विभागाने जप्त केले आहेत.