हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालन्यात (Jalna) सर्वधर्मीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी, दोन्ही कुटुंबीयांना साथ देण्यासाठी बहुसंख्य लोक आणि त्यांच्यासह नेते, समाजसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या मुलीनेही संवाद साधला.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने म्हणले की, “माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना एकच प्रश्न विचारते. का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारले. त्यांना त्यावेळी किती वेदना झाल्या असतील. त्याचे उत्तर मला हवे आहे. आज माझे पप्पा माझ्यासोबत नाहीत याची मला खंत वाटते. पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे आजपर्यंत जसे हसत राहिला तसेच हसत राहा आणि आम्हा देशमुख कुटुंबाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही”
दरम्यान, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून अंबड चौफुलीपर्यंत हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, खा. कल्याण काळे यांच्यासह अनेक समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती.