औरंगाबाद | छत्तीस महिन्याचा करारनामा करून गॅरेजसाठी किरायाने दिलेल्या प्लॉट जावयाने स्वतःच्या नावावर करून परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात जावया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश प्रेमकुमार अग्रवाल असे जावयाचे नाव आहे. विजय हिरालाल अग्रवाल वय 61, (रा. विष्णू नगर जवाहर कॉलनी) असे सासर्याचे नाव आहे. विजय हे मिठाईचे व्यापारी आहेत. त्यांना रुचिता ही एकुलती एक मुलगी आहे ती सध्या त्यांच्यासोबतच राहते.
2012 मध्ये बगरशेरगंज दाऊदपुर येथे 1 हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. 6 नोव्हेंबर 2020 रोजी व्यंकट पिराजीराव यांना गॅरेजसाठी 36 महिन्याचा भाड्याने दिला होता. प्लॉटचा करारनामा करताना जावई निलेश अग्रवाल हा साक्षीदार होता. 20 जुलै रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास अग्रवाल यांना भाडेकरूने फोन करून सांगितले की ते चार पाच जणांनी गॅरेजवर येऊन धमकावले तसेच हा प्लॉट त्यांचा असल्याचे सांगितले. विजय हिरामण पडवळ आणि संजय अर्जुनदास डायरानी यांनी आम्ही हा प्लॉट जावई निलेश कडून खरेदी केल्याचे सांगितले.
सुशील भिसे नावाच्या व्यक्ती सोबत तीन ते चार महिला होत्या. त्यांनी हा प्लॉट लगेचच रिकामा करा असे भाडेकरूला धमकावले होते. त्यावरून निलेशने या प्लॉटची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्लॉटची मूळ कागदपत्रे देखील घरातून गायब असल्याचे अग्रवाल यांच्या लक्षात आले. त्यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात रविवारी जावया विरुद्ध तक्रार केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक घोरपडे हे करत आहेत.