राज कुंद्राला सुनावण्यात आली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई । पोर्नोग्राफीप्रकरणी अटकेत असलेला उद्योगपती राज कुंद्रा याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर पॉर्न फिल्म तयार करून मोबाईल अ‍ॅपद्वारे पसरवल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात पॉर्न फिल्म बनवून अ‍ॅप्सच्या माध्यमातून अपलोड केल्याचा खुलासा केला होता. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रासाठी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली असली तरी कोर्टाने मुंबई पोलिसांची विनंती नाकारली.

यापूर्वी कोर्टाने राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजला त्याच्या घरी नेऊन या प्रकरणाची चौकशी केली. तसेच त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली.

राज कुंद्राच्या घराबरोबरच त्यांच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली, तेथून गुन्हे शाखेने एका गुप्त लॉकरमधून काही व्हिडिओही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे.