कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहरातील वाढीव भागातील रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत येथील नागरिकांच्यावतीने रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात वारंवार मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, त्याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने याविरोधात भीम आर्मी पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी कराड पालिकेस 15 आँगस्टला लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जावेद नायकवडी यांनी पालिका प्रशासनास इशाऱ्याचे निवेदनही दिले असल्याची माहिती दिली. यावेळी नायकवडी म्हणाले की, कराड शहरातील वाढीव भागातील वॉर्ड क्रमांक 13 व 14 येथील नागरिकांना अजूनही विविध सुविधा मिळत नाहीत. येथील रस्त्यांची तर मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
उलट कराड नगर पालिकेकडून येथील नागरिकांची सक्तीने कर वसुली केली जाते. या भागात रस्ते, ड्रेनेजचे काम पुर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सदर भागातील रस्ते व इतर सुविधांसाठी 15 आँगस्टला लक्षवेधी आंदोलन करणार, असल्याचा इशारा नायकवडी यांनी दिला आहे.