जयहिंद ! वाठार स्टेशन येथील जवान विशाल पवार यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरेगाव | वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्वास पवार (वय – 32) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. विशाल पवार जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी 16 मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत होते. एक वर्षापूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उदमपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल हलविण्यात आले. तीन  महिन्यापासून त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. काल दुपारी 4 : 30 वाजता त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

गेले 14 वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी आसाम, ग्वालियर,  जम्मू काश्मीर (राजुरी) या ठिकाणी देशसेवा केली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. गावाकडे सुट्टीवर असताना ते मनमिळावू स्वभावामुळे ग्रामस्थांच्या परिचित होते. त्यांचे मूळ गाव गुजरवाडी हे आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंबीय वाठार स्टेशन येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या वडिलांनी सातारा पोलीस दलात  सेवा बजावली. विशाल पवार यांच्या निधनाची बातमी कळताच वाठार स्टेशन पंचक्रोशीवर दुखःचे सावट पसरले.

आज सकाळ पासून वाठार येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ संपूर्णपणे बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तत्पूर्वी शहीद जवान विशाल पवार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दुतर्फा उभे राहून फुलांची आदरांजली वाहिली. सातारा पोलीस दलाच्या वतीने त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी आ. महेश शिंदे, आ. दिपक चव्हाण, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सरपंच नीता माने, लष्कराचे अधिकारी, जवान, पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment