हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांच्या सोबत आहेत.. पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत… होय.. असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी.. पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरुनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली.. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत सेटलमेंट करत होते.. हे ताबडतोब थांबवायला हवं.. नाहीतर विधानसभेला घात होऊ शकतो…असं जाहीरपणे ट्विट करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं… पण पवारांच्या वाईट काळातही त्यांच्या पाठीमागे ढालीसारखे उभ्या राहिलेल्या जयंत पाटलांवर इतके गंभीर आरोप का होतायत? जयंत पाटील खरंच फुटीर आहेत का? पडद्याआड राहून ते नक्की मग कुणाचं काम करतायत? यातलं खरं काय आणि खोटं काय? त्याचाच हा आढावा…
जयंत पाटलांच्या क्रेडिबिलिटी वर शंका घेतली जातेय त्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांची…अजितदादांनी पक्षामध्ये बंड घडवून आणण्याच्या आधीपासून जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या… भाजप नेत्यांनी तर जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या अनेक तारखा डिक्लेअर करून टाकल्या…त्यांच्यावर इडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचंही बोललं गेलं…पक्ष सोडण्यासाठी ते योग्य टायमिंगच्या शोधात आहेत तसंच महायुती सरकारमध्ये जलसंपदा खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचं वाटप झालं नाही मुळात तेच खातं जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आलय, अशा चर्चा पब्लिक डोमेनमध्ये अधून मधून होत असतात… विधानसभा अधिवेशनात मिश्किलपणाने का होईना “ आमचं तुमच्यावर लक्ष पण तुमचंच नाही…” असं म्हणून जयंत पाटलांना घातलेली साद बरंच काही सांगून जाते… अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत आल्यापासून भाजपची महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली… पण पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटलांसारखं राजकारणावर पकड असणाऱ्या… सहकार आणि राजकारणाच्या खाचा खुणा माहीत असणाऱ्या नेतृत्वाची भाजपला गरज होती…म्हणूनच युती सरकार आल्यापासून जयंत पाटील आणि भाजपमध्ये चर्चांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्याचं बोललं गेलं…भाजपसोबतची त्यांची वाढती जवळीक पाहता अजितदादादा यांनी जयंत पाटलांना जाब विचारल्याचं काही वृत्तपत्रांमध्येही नमूद करण्यात आलय…पण जयंत पाटलांच्या आधीच अजितदादा भाजपसोबत गेल्याने आता जयंत पाटलांचा हा निर्णय बारगळला असल्याचंही बोललं जातं…
जयंत पाटील फुटीर आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या मुद्द्याचा विचार करावा लागतो तो म्हणजे लोकसभा निवडणुकांचा निकाल…जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळेच शरद पवारांच्या तुतारीला दहा पैकी तब्बल आठ जागांवर दणक्यात विजय मिळवता आला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही…जयंत पाटलांचे कष्ट, मेहनत त्यामागे होती…मात्र रावेरमध्ये भली मोठी ताकद असताना आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करूनही माजी आमदार संतोष चौधरी यांचा पत्ता कट करून त्याजागी उद्योजक मात्र नवखे राजकारणी श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली… नाथाभाऊ यांच्या सुनबाई रक्षा खडसे इथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यामुळेच राष्ट्रवादीनं इथे रक्षा खडसे यांना फ्री हिट दिल्याचंही बोललं गेलं… श्रीराम पाटील यांनी रावेरमधून कडवी टक्कर दिली पण त्यांना पक्ष संघटनेकडून म्हणावी अशी ताकद मिळाली नाही, या रोहित पवारांच्या स्टेटमेंटने यात आणखीनच आग ओतली… अर्थात या सगळ्यात त्यांच्या बोलण्याचा कल हा जयंत पाटलांकडे होता… यासोबतच सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या उमेदवारीला विरोध करून इथून शिवसेनेनं निवडणूक लढवावी… तर हातकणंगलेत राजू शेट्टींना विरोध असल्याने कॉम्प्रमाईज न करता तिथून महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा, असा जो काही फोर्स होता तो जयंत पाटलांचाच असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणं होतं…सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत…म्हणूनच मतदानाच्या दिवशीची जयंत पाटलांच्या प्रभावाखालील मत ही संजय काकांना शिफ्ट झाल्याची चर्चा मतदार संघात होतेय…हे कमी होतं की काय म्हणून रोहित पवारांनी निवडणुकीच्या काळात आपल्यातील काही नेते रात्रीच्या अंधारात विरोधकांना मदत करत होते…विधानसभेला याचा फटका बसू शकतो… अशा बेधडकपणे केलेल्या ट्वीट वरूनही आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अंदाज लागू शकतो…
याच यादीतला तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षातूनच जयंत पाटलांवर व्यक्त केली जाणारी नाराजी ….. शरद पवारांचा अत्यंत विश्वासू नेता कोण असेल तर ते म्हणजे जयंत पाटील…अजितदादांसारखा कणखर चेहरा पक्षामध्ये असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांना नेहमीच पक्ष संघटनेतील महत्त्वाची पदं दिली… पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असताना स्वतःची दादांनी आपल्याला पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली होती… पण असं असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांवरच विश्वास टाकला… राष्ट्रवादी एकसंध असतानाही जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला…जयंत पाटलांवरच्या नाराजीमुळेच राष्ट्रवादीचा मातब्बरांचा एक मोठा गट अजित पवारांसोबत गेल्याची चर्चाही अनेकदा होत असते…जयंत पाटलांना मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा आहे…म्हणूनच अजितदादांचं राजकारण पुढे सरकत नव्हतं…असा आरोप होत असतो.. आता मात्र पक्ष फुटीनंतर रोहित पवारांनीही जयंत पाटलांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केल्याने आता या सगळ्या वादाचं पुढे काय होणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे…
जाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल… ती म्हणजे अनेकदा ईडी, सीबीआय यांचा दबाव असतानाही जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच कायम राहिले…राष्ट्रवादीत धुसपुस असतानाही जयंत पाटलांनी ती मोठ्या कष्टाने रोखून धरली… एवढंच काय तर नवं नाव आणि चिन्हं घेऊन पक्षाला शून्यातून आठ खासदारांपर्यंत पोहोचवण्यात जयंत पाटलांनी गाळलेला घाम उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय… त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स मत बनवलं तर जयंत पाटील फुटीर आहेत, असं स्पष्ट बोलणं थोडसं धाडसाचं होईल… बाकी रोहित पवारांच्या या आरोपानंतर जयंत पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,