हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठं बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली. बाबाजानी दुर्रानी यांच्या कार्यकर्त्यानी जयंत पाटील यांचं जंगी स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाबाजानी दुर्रानी घड्याळ सोडून पवारांची तुतारी हातात घेणार का? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष्य लागलं आहे. त्यानुसार सर्वजण कामाला लागले असून जागांची चाचपणी, मतदार संघाचा आढावा चाललाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेच्या तयारीला लागलाय. पक्षाकडून संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली. बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार आहेत. येत्या २ दिवसातच त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे अशा वेळी जयंत पाटील यांनी बाबाजानी दुर्रानी यांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा शरद पवारांनी दादा गटातील निलेश लंके, बजरंग सोनावणे यांच्यासारखे नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आणलं. आताही सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार गटातील अनेक आमदार हे शरद पवारांकडे स्वगृही परततील अशा चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्रानी यांची भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. बाबाजानी दुर्राणी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी हातात घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे.