हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (Maha Vikas Agahdi) प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) याना थेट ऑफर दिली आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. एकीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, छत्रपती संभाजी राजे यांची तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोक्याच्या क्षणी बच्चू कडू याना ऑफर देण्यात आल्याने महाराष्ट्राचे राजकारण आणखी रंजक बनले आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी म्हंटल कि, बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं. आम्ही भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात आम्ही एका आघाडी तयार केली आहे. परंतु आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे, आम्हाला बच्चू कडू यांची काहीही अडचण नाही. त्यामुळे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी जर महाविकास आघाडीत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. जयंत पाटील यांच्या या ऑफरवर बच्चू कडू नेमका कोणता निर्णय घेतात यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा स्पष्ट होऊ शकते.
बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर –
दरम्यान, नाशिक येथील जाहीर सभेत कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला होता. जेव्हा शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार आहे, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस आणि भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था आम्ही उखडून फेकणार आहोत. तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली. तसेच आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी उपस्थित जनतेला केलं.