राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठीही मुहूर्त शोधत आहे काय ? जयंत पाटील यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात दिली. ३१ ऑक्टोबर रोजी कोणता मुहूर्त आहे? भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यास उशीर केला जात आहे. असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. यावेळी राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यासाठीही मुहूर्त शोधत आहे काय?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून राज्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलने केली जात आहेत. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. त्याची साधी दखलही घ्यायला सरकार तयार नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ ऑक्टोबरला ४ वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना, अशी विचारणा त्यांनी केली.

लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. सरकारचे हे अपयश आहे. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता पण महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. भाजपला लोकांची काहीच चिंता नाही भाजपला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. अशी टीका त्यांनी केली. राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना या सर्वच योजना उघड्या पडल्या आहेत. या सर्वच योजना अपयशी ठरल्या आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

Join us at WhatsApp

Leave a Comment