हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे ४ जूनच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जाणार आहेत, त्यांनी त्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे असा खळबळजनक दावा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केला आहे. तर जयंत पाटील काँग्रेसमध्ये नक्कीच जाऊ शकतात असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही सुरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. आता यावर जयंत पाटील काय उत्तर देतात ते पाहायला हवं.
सुरज चव्हाण काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील. जयंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितली आहे. त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे. त्यामुळे ४ जूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा रिकामा होईल आणि तिकडचे अनके लोक अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली पक्षप्रवेश करतील असं सुरज चव्हाण यांनी म्हंटल आहे. सुरज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहायला हवं.
दुसरीकडे , भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनीही सूरज चव्हाण यांच्या दाव्यात हवा भरली आहे. जयंत पाटील हे यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होते परंतु या बोलण्याला त्याठिकाणी अर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भविष्य जयंत पाटील याना माहित आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात असं प्रवीण दरेकर यांनी म्हंटल.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडखोरीनतर अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र जयंत पाटील यांनी मात्र एकनिष्ठेने शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजही जयंत पाटील हेच शरद पवार गटाकडून किल्ला लढवताना दिसतात. मात्र अधून मधून त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा प्रसारमाध्यमात सुरु असतात. यापूर्वी सुद्धा जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असून अमित शाह आणि त्यांची भेट झाली असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या बातमीचे खंडन करत आपण कधीच शरद पवारांची साथ सोडणार नाही असं ठणकावून सांगितलं होते. आता सुरज चव्हाण यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.