हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर टीका करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विट केला असून राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्याबद्दल त्याचे नमन करतो असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रति दाखवलेल्या अदरातिथ्यामुळे भाजप नेत्यांकडून राऊतांवर निशाणा सोडला जात आहे. याबाबत राज्यातील भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. तर राऊत यांचे कौतकही केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला असून त्यात त्यांनी म्हंटले आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिली. शरद पवारांची प्रकृती पाहता कोणताही माणुसकी असलेला माणूस त्यांना खुर्ची देण्याचा विचार करेल. जेव्हा आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभे राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे.
नमन @rautsanjay61 #sanskar #Sanskari #Sanskruti pic.twitter.com/ZGZUaUKY4C
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 9, 2021
तो काय आहे, कोण आहे हेदेखील आपण पाहत नाही. वयोवृद्ध व्यक्ती आली आणि आपल्याला जर त्यांना काय अडचणी आहेत माहिती असेल तर ते करतोच. संजय राऊत यांनी तसं केलं असेल तर त्यांच्यातील माणुसकीचे संस्कार दिसलेत. त्याच्याबद्दल एवढी चर्चा कशासाठी? हे महाराष्ट्रात काय सुरु आहे? मुख्यमंत्री आल्यानंतर कितीही मोठा मंत्री असला तरी तो उठून उभा राहतो. हा त्या मुख्यमंत्रीपदाचा आदर आहे. शरद पवार या व्यक्तिमत्वाबद्दल, वयाबद्दल, त्यांच्या शारिरीक अस्वस्थेबद्दल ज्यांना माहिती आहे त्यातील संजय राऊत आहेत. त्यांनी तात्काळ खुर्ची आणली आणि दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि नमन करतो’, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.