‘त्या’ शिवसेना विभागप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरार पूर्वेकडील साईनाथनगर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख जितू खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर संबंधित महिला ही विरारलाच राहते. आरोपी जितू हा तिला फोन करुन, आयटम आहे का? अशी विचारणा करुन त्रास देत होता. यानंतर या महिलेने आरोपी जितू खाडे याला रिक्षामध्ये बसलेला असताना चपलेने बेदम मारहाण केली. यानंतर महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच जितू खाडे हा फरार झाला होता.

पीडित महिला रिक्षाचालक असून आरोपी जितेंद्र खाडे हा वारंवार तिला फोन करुन सेक्ससाठी महिलांची मागणी तिच्याकडे करायचा. अखेर महिलेने त्याला 24 जानेवारी रोजी रस्त्यात पकडला आणि आयटम पाहिजे ? असे विचारत रिक्षात घालून चपलेने चोपून काढला. रस्त्यावर जमलेल्या बघ्यांपैकी कुणीतरी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. तेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.

शिवसेनेकडून कारवाईचा बडगा
शिवसेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. जितू खाडेच्या कृतीचा निषेध केला असून खाडेच्या कृतीला आपला पाठिंबा नसल्याचे शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी स्पष्ट केले होते. यानंतर पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी पत्रक काढून जितेंद्र खाडे याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.