Tuesday, January 7, 2025

Jitesh Antapurkar : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप!! या आमदाराने दिला राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यामध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. त्यामुळे जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर आज त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या यादीत त्यांच्या नावाची सातत्याने होत असलेली चर्चा या दोन कारणामुळे जितेश अंतापूरकर हे लवकरच काँग्रेसला रामराम ठोकतील असं बोललं जात होते. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचे तिकीट काँग्रेस कापणार असल्याच्या चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होत्या, त्याच्याच भीतीमुळे जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी राजीनामा दिला नाही ना अशीही चर्चा सुरु आहे.

कोण आहे जितेश अंतापूरकर?

जितेश अंतापूरकर हे देगलूर बिलोलीचे काँग्रेसचे आमदार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे ते सुपुत्र आहेत. कोरोना काळात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन झालं आणि देगलूर मध्ये पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. मात्र अशोक चव्हाण जेव्हापासून भाजपमध्ये गेले तेव्हापासून जितेश अंतापूरकर यांच्यावरही संशयाचा भोवरा होता.