हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse) शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा पुन्हा एकदा गरम झालं आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे सरकारमधील मंत्री पुतळा पडण्यामागे काही बेताल कारणे देत आहेत त्यामुळे आणखी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून १ सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन (Jodo Maro Aandolan) करण्यात येणार आहे. आज मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे , शरद पवार आणि नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत माहिती दिली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले आहे. आता १ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि राज्यभरातील शिवभक्तांनी या निषेध आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. त्याठिकाणी मी स्वतः उभा असेल, पवार साहेब असतील आणि नाना पटोले सुद्धा असतील असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. सरकारने आपल्या बेफिकीरपणामुळे पुतळा उभारला असून त्याचे परिणाम निर्लज्जपणे भोगावे लागणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः शिवाजी महाराजांचा अपमान केला असता. पण कोश्यारीची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.