सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मॉल आणि दुकानांमधून वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेल्या परवानगीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारचं हे पाऊल समाजाला विघातक दिशेकडे घेऊन जाणारं आहे. हा निर्णय रद्द करावा, यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचं भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं. याच पत्रकार परिषदेत संभाजी भिडे यांनी न्यायाधीशांबाबत वादग्रस्त वक्तव्यही केलं आहे.
लिव्ह इन रिलेशनशीपचा निर्णय घेणाऱ्या न्यायाधीशांना संपवलं पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना भिडे म्हणाले की, महाभारत काळात यादवांच्यात प्रचंड भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता वाढली होती. त्यामुळे यादव एकमेकांचा जीव घेऊ लागले. त्यांना रोखण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना नरसंहार करावा लागला. महाराष्ट्रात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पण आता श्रीकृष्ण नाहीत, हे लक्षात असू द्या. राज्य सरकारने घेतलेला निर्णय संतापजनक, राष्ट्रघातक आणि सर्वनाश करणारा आहे. या मंत्रिमंडळात राग येणारा कोणी भीम जिवंत नाही हे दुर्दैव आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात एकही मंत्री किंवा आमदार बोलत नाही हे लांच्छनास्पद आहे, अशी खरमरीत टीका भिडे यांनी केली आहे.
आर. आर. पाटील यांचा दिला दाखला
यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी माजी मंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी केलेल्या डान्स बार बंदीचा दाखला दिला. आज आर.आर. आबा असते तर त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला असता. चिन्यांनी देश खाल्ला तरी तेच चायनीज चवीने खाणारा हिंदू समाज आपल्यात आहे. अनेक जातीच्या संस्थांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उठलं पाहिजे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.
मुंबईतील नाईट लाईफवरही संभाजी भिडे यांनी टीका केली. मुंबईला नाईट लाईफ देण्याची भाषा ही समाजाला व्यभिचाराकडे घेऊन जाणारी आहे. आज दारूला परवानगी दिली. उद्या गांजा आणि आफूलाही परवानगी द्याल, असं म्हणत भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.