सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
निसर्गाची मुक्त हस्ताने रंगाची उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार भागात रंगी बेरंगी अशी दुर्मिळ फुले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. चालू महिन्यात 9 सप्टेंबर पासून हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे 350 प्रजातिची फुले पहायला मिळतात. नुकताच हंगाम सुरू झाला असून पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. परंतु फुलांचा बहर अद्याप आला नसल्याने पर्यंटकांच्यात नाराजी दिसून येत आहे.
जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असलेल्या कास पठारा वर पर्यटकांचा ओघ वाढतोच आहे. अनेक रंगाची विविध आकाराची अनेक दुर्मिळ फुले पाहण्यासाठी देशाचा काना कोपऱ्यातून पर्यटक या पठारावर येत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात या पठारावर फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. हे पठार अनेक प्रकारचा दुर्मिळ जैवविविधतेचे ठिकाण असल्याने या पठाराचा सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी वनविभाग आणि या ठिकाणचे स्थानिक लोक प्रयत्नशील आहेत.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/755728685854357
हौशी पर्यटकांकडून या दुर्मिळ फुलांना वाचविण्यासाठी या ठिकाणी कुंपण उभारण्यात आले होते. मात्र, या कुंपणामुळे इतर वन्य प्राण्यांचा वावर कमी झाल्याने फुलांचे प्रमाण कमी झाल्याचा आरोप काही निसर्गप्रेमींनी केला आहे. या कुंपणाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगून या कुंपनाबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या हा विषय अभ्यासाचा असून त्यावर अभ्यास केला जाईल आणि मगच निर्णय घेतला जाईल.