Kadyavarcha Ganpati : कोकणातील ‘या’ गावात स्थानापन्न होण्यासाठी स्वतः अवतरले होते श्रीगणेश; आजही आहे पावलाची खूण

Kadyavarcha Ganapti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kadyavarcha Ganpati) आजपर्यंत तुम्ही अनेक स्वयंभू मंदिरं पाहिली असाल किंवा त्यांच्याविषयी ऐकले असाल. यातील अनेक मंदिरं ही ऐतिहासिक वस्तूंपैकी एक असतील तर काही मंदिरांची भव्यता लक्षवेधी असेल. अशाच एका अत्यंत जुन्या पुरातन मंदिराबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिथे स्वतः विघ्नविनाशक श्रीगणेश अवतरले आणि स्थानापन्न झाले. इतकेच काय तर या मंदिराच्या परिसरात श्री गणेशाच्या पावलाचा ठसा देखील आहे. या मंदिराचे नाव आहे ‘कड्यावरचा गणपती’. चला तर जाणून घेऊया हे मंदिर कुठे आहे आणि या मंदिराचा इतिहास काय सांगतो?

कड्यावरचा गणपती (Kadyavarcha Ganpati)

कोकण म्हटलं की डोळ्यासमोर दूरवर पसरलेला समुद्रकिनारा, नारळाची डौलदार झाडे, मातीची कौलारू घरं असे चित्र उभे राहते. कोकणात रत्नागिरी हा सौंदर्यसंपन्न जिल्हा मानला जातो. या जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी ‘कड्यावरचा गणपती’ हे मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दापोलीपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजर्ले या गावात ‘कड्यावरचा गणपती’ हे मंदिर स्थित आहे. या भागातील हे स्वयंभू आणि जागृत देवस्थान असल्याचे सांगितले जाते. कारण इथे स्थानापन्न होण्यासाठी स्वतः श्रीगणेश धरतीवर अवतरल्याची आख्यायिका आहे.

मंदिराचा इतिहास

दापोलीतील आंजर्ले गावात असणाऱ्या या गणपती मंदिराला ‘कड्यावरचा गणपती’ असे नाव पडण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. या गणपती बाप्पाचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर (टेकडीवर) आहे. इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. मात्र हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राकाठी होते. (Kadyavarcha Ganpati) पुढे समुद्राची पातळी वाढल्याने हे मंदिर पाण्यात गेले. तेव्हा समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवे मंदिर बांधण्यात आले. यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी पृथ्वीवर अवतरले होते. तेव्हा श्री गणेशाचे पहिले पाऊल हे डोंगराच्या माथ्यावर पडले. तर दुसरे पाऊल थेट नव्याने बांधलेल्या मंदिरात पडले. श्री गणेशाच्या पहिल्या पावलाचा ठसा आजही इथे आहे. ज्याला ‘गणपतीचे पाऊल’ असे म्हटले जाते.

उजव्या सोंडेचा गणपती

(Kadyavarcha Ganpati) ‘कड्यावरचा गणपती’ मंदिराच्या गाभाऱ्यातील गणेश मूर्ती ही देवता उजव्या सोंडेची आहे. या मूर्तीची उंची ५ फूट इतकी असून ही मूर्ती सिंहासनाधिष्ठित आहे. गणेशाची ही मूर्ती काळ्या पाषाणातून घडविलेली आहे. यासोबत गणपती बाप्पाच्या शेजारी अत्यंत सुबकरीत्या त्याच्या पत्नी देवी रिद्धी आणि देवी सिद्धीच्यादेखील मुर्त्या कोरलेल्या आहेत. ही मूर्ती दाभोळच्या पठारवाटांनी घडविल्याचे गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.

६०० वर्ष जुने मंदिर

आंजर्ले गावातील ‘कड्यावरच्या गणपती’ या मंदिराची स्थापना सुमारे ६०० वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १४३० च्या सुमारास करण्यात आल्याचे इथले स्थायिक सांगतात. अनेक आख्यायिकांची साक्ष खरी मानल्यास हे मंदिर १२ व्या शतकातील असल्याचे सांगता येते. त्या काळात जांभ्या दगडात या आजच्या मंदिराची निर्मिती झाली. त्रिस्तरीय स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण २०० पायऱ्या चढून जावे लागते. (Kadyavarcha Ganpati) मात्र, आता मंदिरापर्यंत गाडी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी इथे चांगला पक्का रस्ता बांधण्यात आला आहे. या मंदिराचे पूर्वी लाकडी बांधकाम होते. मात्र पुढे जाऊन हे मंदिर पांढऱ्या रंगाचे दगड वापरून बांधण्यात आले.

शुभ्र रंगाचे गणेश मंदिर

इ. स. १६३० पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन ‘नित्सुरे’ घराण्याकडे असल्याचे सांगितले जाते. त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची मान्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावर ‘अजयरायलेश्वर’ म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी दोन मंदिरे होती. इ.स. १७८९ मध्ये ‘कड्यावरचा गणपती’ या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आणि पेशवेकालीन वास्तुरचनेत हे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराचा जीर्णोद्धार करतेवेळी काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर बांधले गेले.

मंदिराची रचना

साधारणपणे ६५ फूट उंच असलेले हे मंदिर ५० फूट ते ४० फूट क्षेत्रफळाचे आहे. मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट उभारलेला आहे. एकूण १६ कळस असणाऱ्या या मंदिराचे १६ उपकलश गर्भगृहाच्या वर दिसतात. या कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत. तसेच मंदिराचे सभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी रचना आहे. सभागृहाला ८ कमानी आणि घुमटाकृती छत आहे. या गणेश मंदिरासजवळ महादेवाचे देखील मंदिर आहे. तसेच मंदिरासमोर एक तलावसुद्धा आहे. (Kadyavarcha Ganpati)