हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागावाटपाची अजून लांब लांब पर्यंत चर्चा नसताना अजितदादांनी कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली… अजित दादांनी एका दगडात अनेक पक्षी मारले… पण मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाल्याने एका मोठ्या राजकीय समीकरणांचा कागलमध्ये जन्म होण्याची शक्यताय… कागलचा आमदार कोण? असा साधा सोपा प्रश्न विचारला तरी हसन मुश्रीफ गट आणि दुसरीकडे समरजीत सिंग घाटगे गट अगदी कॉन्फिडंटली आमदार तर मीच! असं ठासून सांगतात… पण ज्या कागलच्या मातीचा अंदाज भल्या भल्यांना लागत नाही, त्याच कागलचं वर्तमान राजकारण सध्या शरद पवारांच्या हातातय… होय तुम्ही बरोबर ऐकलंत… यंदा निवडणूक कोणीही लढो, आमदार मात्र तुतारीचाच! असं आम्ही का म्हणतोय? मुश्रीफांच्या विरोधात लढत देण्यासाठी हातात तुतारी घेण्याचा घाटगेंचा प्लॅन खरच ठरलाय का? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
खरंतर जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच कोल्हापुरातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी अजितदादांनी विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून कागलची राजकीय समीकरण बदलून टाकली… कारण या जागेसाठी मुश्रीफांचे पारंपारिक विरोधक समरजीतसिंह घाटगे देखील इच्छुक होते… सध्या भाजपात असणाऱ्या घाटगेंना भाजप हायकमांकडून उमेदवारीचाही शब्द दिल्याच्या चर्चा होत्या… त्यामुळे कागलच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत… यासोबतच मुश्रीफही आपल्या गटाकडूनच लढतील याचं भलं मोठं टेन्शन अजित दादांनी ही उमेदवारी जाहीर करून घालून टाकलं… त्यामुळे प्रतिस्पर्धी घाटगेंचा भाजपकडून उमेदवारी मिळण्याचा चान्स डायरेक्ट निकालात निघून आता त्यांच्याकडे केवळ अपक्ष किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच पर्याय हाताशी राहतो….
या सगळ्या मधल्या राजकारणात समरजीतसिंह घाटगेंना गळाला लावण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केल्याच्याही चर्चा झाल्या… घाटगेंचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून घेण्यासाठी दोनदा संपर्क झाला… याची सगळी जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर असल्याचेही बोलण्यात येतय… मात्र मी कुठेही जाणार नसून माझ्या विरोधात खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचं क्लेरिफिकेशन घाटगेंनी दिलं असलं तरी ग्राउंड स्पष्ट सांगतय की, घाटगेंना काटे की टक्कर द्यायची असेल किंवा मुश्रीफांचं वर्चस्व मोडीत काढून आमदार व्हायचं असेल तर सध्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाहीये…आम्ही असं का म्हणतोय? ते समजून घेण्याआधी कागलच्या वर्तमान परिस्थितीवर एकवार नजर टाकूयात…. शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणूनच कागलमध्ये हसन मुश्रीफांना राजकीय बस्तान बसवता आलं, हे वास्तव आहे… सदाशिवराव मंडलिक यांच्या हाताला हात धरून राजकारण करणाऱ्या मुश्रीफांनी राष्ट्रवादीत स्वतःचा स्वतंत्र मुश्रीफ गट स्थापन केला… विशेष म्हणजे शरद पवारांसमोर जेव्हा मंडलिक की मुश्रीफ ? असा पेच होता तेव्हा शरद पवारांनी मुश्रीफांच्या पारड्यात वजन टाकलं… यावरून मुश्रीफांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा किती वाट आहे? ते वेगळ्या शब्दात सांगायला नको… मुश्रीफांवर ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा दबाव होता… तरीदेखील ते हिंमतीने त्याला विरोध करत होते… कागल ची माती लढणाऱ्याच्या पाठीशी उभी राहते… इथेही तसंच होतं… ईडीच्या विरोधात फाईट दिल्यामुळे मुश्रीफांच्या बाजूने सहानुभूतीचा गट सोबत होता…
पण अजितदादांसोबत महायुतीत जाऊन मुश्रीफांच्या बाजूने असणारा हा सहानुभूतीचा टक्का वेगाने घसरला… आपल्याला याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा लॉस होऊ शकतो, याचीही पुरेपूर कल्पना मुश्रीफांना आहेच… पण इथं समरजीतसिंह घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर कागलची फाईट घाटगे विरुद्ध मुश्रीफ अशी दोन गटांमध्येच होणार… गटाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुश्रीफांचे पारड हे नेहमीच जड दिसतं… अशा वेळेस घाटगे जर शरद पवार गटात आले… तर ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार… आणि अप्रत्यक्षपणे शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ अशी फाईट होते… इथं पारड अर्थातच शरद पवारांच्या बाजूने झुकतं… कागल च्या बाबतीत काही अभ्यासक सांगतात की, मतदारसंघात जवळपास 35000 मतदान असं आहे जे की, इमोशनसवर मतदान करतं… सध्याच्या घडीला हे सगळं मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं आहे… त्यातही जेव्हा विषय शरद पवारांच्या तुतारीचा येतो, तेव्हा हे सारं मतदान तुतारीच्या उमेदवाराच्या पाठीशी येऊ शकतं… थोडक्यात हसन मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला मात द्यायची असेल तर शरद पवारांच्या तुतारी शिवाय पर्याय नाही, हे तर क्लिअर कट आहे…
सध्या शिवसेना ठाकरे गटात असणाऱ्या संजय घाटगेंनी महाविकास आघाडी धर्माला न जागता कागल विधानसभेसाठी हसन मुश्रीफांना पाठिंबा देऊन टाकलाय(sanjay ghatge with hasan mushrif)… त्यामुळे मुश्रीफ यांचं काकणभर का होईना, पण पारडं सध्या जड आहे… त्यामुळे मंडलिक गट नेमकं कोणाच्या बाजूने झुकतो? यावरही कागलची बरीचशी समीकरणे अवलंबून असणार आहेत… मुश्रीफ सध्या कागलमध्ये प्लस मध्ये आहेत का? असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो… तेव्हा त्याचे उत्तर हो असंच येतं…. पण जेव्हा शरद पवार यांच्या बाजूने असणारी सहानुभूती, महायुतीला कंटाळलेली जनता, घाटगे गटाची ताकद आणि या सगळ्यांना मिळणारा कागलमधील अंतर्गत गटातटाचा पाठिंबा अशा स्केल वर हे चित्रं पाहिलं तर कागलमध्ये तुतारी आरामात वाजतेय, असं चित्र आहे… त्यामुळे आता घाटगे यास संधीचं सोनं करून तुतारी हाती घेतली? की काही वेगळा निर्णय घेतील हे त्यांचं त्यांनाच ठावूक…