कळंबा कारागृहातील महिला बंदिजनांसाठी दोन दिवसीय वारली पेंटींग कार्यशाळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

भागीरथी महिला संस्था आणि युवती मंचच्या वतीनं दोन दिवसीय वारली पेंटींग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेतून कारागृहातील महिला बंदिजनांना वारली पेंटींगचे धडे देण्यात आले.

भागीरथी महिला संस्था आणि युवती मंचच्या वतीनं, कळंबा कारागृहातील महिला बंदिजनांसाठी दोन दिवसीय वारली पेटींग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भागामध्ये वारली ही एक जमात आहे. त्यांनी निर्माण केलेल्या चित्रांना, वारली पेंटींग असं समजलं जातं. वारली जमात चित्र साकारताना प्रथम घरातील भिंती शेणानं सारवतात. त्यावर लाल मातीचा थर दिला जातो. बाबूंची टोकदार काडी आणि तांदळाची पेज या गोष्टींचा वापर करून हे आदिवासी बांधव चित्रं साकारतात. त्यांच्या चित्रांमध्ये एकप्रकारे त्यांची जीवनशैली दिसून येते. भाताची कापणी, कुटूंबातील सदस्यांचा जन्म, सण, उत्सव, लग्न समारंभ आणि निसर्गचक्र यांचं प्रतिबिंब चित्रांमध्ये असतं.

या कार्यशाळेत प्रशिक्षिका प्रिया चिवटे यांनी, कारागृहातील महिला बंदिजनांना वारली पेंटींगचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं. यावेळी आदिवासी महिला आणि पुरूष यांची वाद्यं, डेरेदार वृक्ष, पशुपक्षी, भांडी यांच्या चित्रांचं प्रात्यक्षिकं दाखवण्यात आलं. वारली पेंटींगची पध्दत, त्याचा उपयोग याबाबत प्रिया चिवटे यांनी माहिती दिली. याप्रसंगी कारागृह अधीक्षक शरद शेळके, तुरूंग अधिकारी चंद्रकांत आवळे, महिला तुरूंग अधिकारी मिरा बाबर, कारागृह पोलीस गीतांजली नाईक, वनिता वाघमारे, शरयू भोसले, प्रिती खोत यांच्यासह महिला बंदिजन उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment