हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला… तर त्याच्या जवळच लागून असलेला कल्याण (Kalyan Lok Sabha 2024) हा श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला…सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी वडिलांच्या नावावर 2014 ला खासदारकी पदरात पाडून घेतली. पण 2019 ची लोकसभा उजाडता श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं असं राजकारण उभं करत विकास कामांच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा खासदारकी मोठ्या लीडने जिंकली. कल्याण आणि श्रीकांत शिंदे हे समीकरण त्यांनी असं काही बनवून ठेवलं की राजकारणाच्या कुठल्याही खेळ्या त्यांना कल्याण पासून वेगळं करू शकणार नव्हतं. म्हणूनच 2024 ला महायुतीकडून सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मागच्या दोन टर्म मध्ये आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पदावर असल्यापासून श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) मतदारसंघात मोठा निधी आणत पैशांचा पाऊस पाडला. हीच डी फॉर डेव्हलपमेंटची लाईन मोठी करत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात असताना त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कडवी झुंज देणारा एक मोठा चेहरा मैदानात आणला जाईल, असा सर्वांचाच अंदाज होता. म्हणूनच सुषमा अंधारे, वरुण देसाई अशा अनेक नावांचा विचार या जागेसाठी करण्यात येत होता. पण उद्धव ठाकरेंनी अगदी मोघपणे बोलताना कल्याणच्या उमेदवारीची घोषणा केली आणि सगळ्यांना धक्का बसला… कारण ठाकरेंनी दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेंच्या विरोधात एका सर्वसामान्य माजी नगरसेवकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. ते नाव म्हणजे वैशाली दरेकर.
सुरुवातीला कल्याणच्या जागेवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात साटलोट झाल्याच्या बऱ्याच वावड्या उठल्या. ठाकरेंनी शिंदेंना फ्री चेंडू खेळायला दिला असाही आरोप झाला. पण मतदान अगदी तोंडावर आलेलं असताना ठाकरेंची डोकॅलिटी आता समोर येऊ लागलीय. श्रीकांत शिंदे यांचा गेम करण्यासाठीच वैशाली दरेकर हा साधा चेहरा ठाकरेंनी उमेदवार म्हणून पुढे केलाय. त्यामुळे भल्याभल्यांना जमलं नाही ते शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दरेकर करून दाखवणार? शिंदेंच्या कल्याणमधील वर्चस्वाला धक्का लावून वैशाली दरेकारांची मशाल पेटेल, असं आम्ही आत्मविश्वासाने का म्हणतोय? तेच पाहुयात
श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरेंच्या या निर्णयावर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांसारख्या दिग्गज चेहऱ्यांचा कल्याणच्या जागेसाठी विचार चालू असताना अचानक दरेकर यांना दिलेली उमेदवारी पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदेंची लोकसभेची हॅट्रिक पूर्ण होणार, असं मतदारसंघात बोललं जाऊ लागलं. पण आता मतदान उद्यावर येऊन ठेपलेलं असताना वारं बरच फिरलय. वैशाली दरेकर या सुरुवातीपासुनच हार्डकोर शिवसैनिक. पण 2009 मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करत कल्याणमधून लोकसभा लढवली होती. तेव्हा त्यांनी लाखांहून अधिक मतं घेत अनेकांना धक्का दिला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरही त्यांनी काही काळ काम पाहिलं.आक्रमक शैली आणि बेधडक भाषणांनी त्यांना राजकारणात चांगला युएसपी मिळवून दिला. पण त्यांनी पुन्हा शिवसेना जॉईन केली. शिंदेंच्या फुटीच्या वेळेस त्या मात्र ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्या. त्याचीच पावती म्हणून की काय दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. पण एका प्रस्थापित खासदाराच्या विरोधात एका सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीत उतरवून ठाकरेंनी इथं लढण्याआधीच शस्त्र खाली टाकली का? तर याचं उत्तर येतं, नाही… यांचं कारण म्हणजे शिवसेनेच्या धक्कातंत्राचा इतिहास…
राष्ट्रवादी, काँग्रेस हा पक्ष प्रस्थापित राजकारण्यांचा, सहकार आणि कारखानदारीवर मोठ्या झालेल्या नेत्यांचा राहिला. या तुलनेत शिवसेनेनं पान टपरीवाल्यापासून ते चहा वाल्यापर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला राजकारणासाठी स्पेस दिला… ते आमदार, खासदार झाले… थोडक्यात शिवसेनेसाठी नेता महत्त्वाचा असतोच पण त्यापलीकडे मातोश्रीशी असणारी निष्ठाही महत्त्वाची असते… त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगा फटका दिला. त्यांना शिवसैनिकांनी मतदानातून त्याचं योग्य बक्षीस दिलं. छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून गेले होते तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरेंनी बाळा नांदगावकरांसारख्या एका साध्या नगरसेवकाला निवडून आणत भुजबळांना इंगा दाखवला होता. यंदा तर शिंदेंनी पक्ष फोडल्याने ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीचं वार दिसतंय. त्यात निवडणूक ही शिंदेंच्या मुलाच्या विरोधात होत असल्यानं याला निष्ठेची धार आणखीनच चढणार आहे… अगदी लांब लांब पर्यंत विजय आपल्या हातातही नाही. असं वाटत असताना शिवसेनेनं निवडणूक ही शिवसैनिकांच्या भरोशावर सोडली. असंच काहीसं सध्या कल्याणमध्ये घडतंय. श्रीकांत शिंदे यांना घोडे मैदान सोपं वाटत असलं तरी सहानुभूतीची सुप्त लाट, शिवसैनिकांची ताकद हे सगळं दरेकरांच्या पाठीशी मतदानाच्या दिवशी उभे राहणार आहे, एवढं मात्र नक्की…
दुसरा मुद्दा येतो तो गटातटामुळे होणार नुकसान टाळण्याचा…
महायुतीमध्ये कल्याणची जागा भाजपला सोडण्यात यावी यावरून बरंच राजकारण घडलं. कल्याणमधील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी आम्ही शिंदेंना सपोर्ट करणार नाही, असा पवित्र घेतला… शेवटी बरीच घासाघीस झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली.. असं असलं तरी कल्याणमधील भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठीशी एकदिलाने उभे राहतील का? हा मोठा प्रश्न आहे.. मतदानाच्या दिवशी त्यांना आपल्याच मित्र पक्षांकडून दगाफटका होण्याचे चान्सेस अधिक आहेत. पण हीच गोष्ट ठाकरेंनी जाणीवपूर्वक टाळली…कुठल्या गटाच्या तटाच्या नेत्याला उमेदवारी देण्यापेक्षा या सर्वांपासून लांब असणाऱ्या एका सर्वसामान्य नेत्याला उमेदवारी देऊन त्यांनी पक्षांतर्गत बंडाळीला आवर घातला…उलट ठाकरे गटाचे सर्वच कार्यकर्ते हे दरेकरांचा प्रचार एकदिलाने करताना दिसून आले…व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी कल्याणची लढत घेऊन न जाता सर्वसामान्य चेहरा दिल्यामुळे शिंदे विरुद्ध निष्ठा असा रंग त्यांनी या जागेला दिला…याचाच इम्पॅक्ट मतदानाच्या दिवशी ठाकरेंच्या बाजूने शिफ्ट होताना दिसून येऊ शकतो…
तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भाजपची मतं वळती करून घेण्याची संधी
महायुती पूर्ण राज्यात समन्वय साधून निवडणूक लढत असली तरी ठाण्यात मात्र शिंदे आणि भाजप यांच्यात बरेच मनभेद झालेत. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने याला आणखीनच हवा दिली…कल्याणच्या निवडणुकीच्या प्रचाराचाही बेस हा मोदी सेंट्रिक न राहता तो श्रीकांत शिंदे राहिला, हे देखील बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांना पटलं नाही. त्यामुळे भाजपच्या बाजूने असणारी ही हक्काची मतं ट्रान्सफर होण्याची दाट शक्यता आहे. याचाच फायदा घेण्यासाठी दरेकर या मतदारसंघात दारोदारी फिरल्या… भाजपच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीला टारगेट करतानाच त्यांचा सर्वात जास्त फोकस राहिला तो शिंदेंनी केलेल्या बंडाचा! नरेंद्र मोदींना थोडासा सॉफ्ट कॉर्नर देत दरेकर या एकनाथ शिंदेंवर तुटून पडताना दिसल्या. यांचं मेन कारण हे भाजपची मतं आपल्याकडे शिफ्ट करून घेण्याचा असल्याचं लक्षात येतं. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हा अंतर्गत विरोध दरेकर यांच्या पथ्यावर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत…
हे सगळं वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदेंच्या विरोधात स्ट्रॉंग बनवतं. कल्याणची उमेदवारी ही ठाकरेंनी हारण्यासाठी दिली नसून कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठीच दिली आहे…त्यासाठी त्यांनी कल्याणच्या पॉलिटिक्समधील जवळपास सर्वच डायनामिक्सचा विचार केल्याने कल्याणचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो…त्यामुळे शिंदेंसाठी सर्वात सेफ समजल्या जाणाऱ्या त्यांच्याच मुलाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातच आता मतदान उलटं होण्याची शक्यता वाढलीय… सलग दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या श्रीकांत शिंदेंना धक्का देत वैशाली दरेकर या निवडून आल्या तर शिवसेना पक्ष आणि नाव चोरलं असलं तरी शिवसैनिक आजही मातोश्रीपाशीच निष्ठा बाळगून आहे, हे चित्र आणखीन स्पष्ट होईल.श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर या लढतीत विजय कोणाचा होईल? मशाल की धनुष्यबाण? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.