परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : मोदी सरकार जनरल डायरची भाषा बोलत आहे, शाहीन बागमध्ये जालियानवाला बाग घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा घणाघाती आरोप विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केला आहे. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ मंगळवार दि २८ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तो बोलत होता.
देशात पुन्हा एकदा हिंदू व मुसलमान यांची फाळणी करून दंगे घडवून आणण्याचा कट म्हणजे NPR, NRC व CAA कायदा असल्याचे मत कन्हैय्याने व्यक्त केले तसेच देशाचे संविधान संपविण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचे त्याने सांगितले.
मोदी सरकारच्या सर्वच निर्णयानंतर देशाच्या एकात्मतेला, अर्थव्यवस्थेला व संविधानाला धक्का पोहोचत असल्याचे भाष्य करत देशाचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कन्हैय्याकुमारने जोरदार टीका केली.
पुढे बोलताना कन्हैयाकुमार म्हणाला की, एनआरसी व एनपीआर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एप्रिल महिन्यापासून याची भारतभर सुरुवात होणार आहे. यावेळी सरकारी कर्मचारी सर्वांच्या घरी येत माहिती घेणार आहेत, त्यानंतर कार्यालयात बसून संदिग्ध नागरिकांची यादी तयार करतील. यासाठी तुमचे वडील कुठे जन्मले? तुमची भाषा काय ?याचा आधार घेतला जाईल. यावेळी तुम्ही माहिती देण्यासाठी नाही म्हणा ! नाही म्हणने हा संविधानाने तुम्हाला दिलेला मूलभूत अधिकार आहे. CAA कायदा आपण हाणून पाडू असेही तो यावेळी बोलताना म्हणाला. प्रधानमंत्री म्हणाले होते की, आम्ही कपड्यावरून आंदोलक कोण आहेत? हे ओळखतो पण त्यांना हे माहीत नाही की तुमच्या भाषेवरून आम्ही तुम्हाला ओळखतो की तुम्ही इंग्रजांची भाषा बोलत आहात, हे स्पष्ट आहे की तुम्ही जनरल डायर ची भाषा बोलत आहात .त्याने जालियनवाला बाग मध्ये शेकडो भारतीयांचे प्राण घेतले. तुम्ही त्याच ईर्षेने दिल्लीतील शाहीन बागच्या नागरिकांना करंट देण्याचा विचार करत आहात. मोदी सरकार जनरल डायरचीभाषा बोलतयं शाहीन बागमध्ये जालियानवाला बाग घडवण्याचं हे षडयंत्र आहे
अशी घणाघाती टीका यावेळी केली.
तब्बल पन्नास मिनिटांच्या भाषणामध्ये कन्हैया कुमारने अर्थव्यवस्था व वाढती बेरोजगारी याच्यावर चिंता व्यक्त करत मोदी सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी वेगवेगळे अनावश्यक मुद्दे काढत असल्याचं यावेळी सांगितलं.प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभेचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी केलं तर काँ. राजन क्षीरसागर, मुजाहेद खान यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
यावेळी मंचावर ह.भ.प सारंगधर महाराज, जि.प. चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर,माजी सभापती दादासाहेब टेंगसे, मुजाहेद खान,बाजार समिती सभापती अनिल नखाते, कॉ. राजन क्षीरसागर, माधवराव जोगदंड, नगराध्यक्षा मिना भोरे, निलेश भोरे,तबरेज खान दुर्राणी, एकनाथ शिंदे, नारायण आढाव, राजीव पामे, अलोक चौधरी, हन्नान खान दुर्राणी, दत्ता मायंदळे अदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल जाधव यांनी केले. कार्यक्रमास मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.