Wednesday, October 5, 2022

Buy now

कन्नड- चाळीसगाव घाटात पोलिसांकडून वसुली

औरंगाबाद – ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कन्नड चाळीसगाव घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. येथून सध्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. परंतु महामार्ग पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बिंदास सुरू आहे. तसेच एका वाहनाचे किती पैसे घेतले जातात याविषयी एका ट्रक चालकाचा व्हिडिओ सोशल मीडिया वरून सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांनी जोरदार वसुली सुरु केल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पर्दाफाश केला. ट्रक ड्रायव्हर असल्याचं भासवून आमदार चव्हाण यांनी पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन केलं. प्रति गाडी 500 रुपये वसुली करणारे पोलीस आणि झिरो पोलीस कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

चाळीसगाव घाट धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र पैसे घेऊन ट्रॅफिक पोलीस धोकादायक घाटातून अवजड वाहने सोडत असल्याचा आरोप आहे. चाळीसगाव घाटातून अवजड वाहनांसाठी प्रत्येकी 500 रुपये घेतले जात असल्याचा दावा केला जातो. भाजप आमदाराने ट्रॅफिक पोलिसांचीही वसुली उघड केली. आमदारांनी धरपकड करताच पोलिसांची धावपळ उडाली होती.