कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बाललैंगिक अत्याचार प्रकरणी एकास पाच वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. कराड येथील विशेष न्यायाधीश तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार फिर्यादी पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले.
याबाबत सहाय्यक सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलीच्या आईने कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड व पोलिसांनी तपास करून संशयितास अटक केली. त्यानंतर कराड येथील न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर सरकार फिर्यादी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी व पुराव्यावरून विशेष न्यायाधीश तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. के. एस. होरे यांनी संशयितास विविध कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ही न्यायालयाने दिली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व दिलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितास शिक्षा सुनावली.