Saturday, March 25, 2023

10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

- Advertisement -

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह ओगलेवाडी (ता. कराड) येथील 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सोबतीने कोरोनावर केलेली मात प्रेरणादायी असून, आजच्या या घटनेमुळे कराड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 11 एप्रिल रोजी ओगलेवाडी येथील एक 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला डेरवण येथील एक 10 महिन्याचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खूपच हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच पुन्हा म्हारुगडेवाडी येथील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या, 78 वर्षीय आईचा अहवाल 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तिघांवरही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करत, हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत आज 10 वर्षे वयाच्या बाळासह 78 वर्षीय वृद्धेलाही कोरोनाच्या विळख्यातून वाचविले. तसेच 28 वर्षीय युवकावरही यशस्वी उपचार करण्यात आले.

आज या तिन्ही रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अन्य स्टाफच्यावतीने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या तिन्ही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ उपस्थित होता.

78 वर्षीय आज्जींचा उत्साह प्रेरणादायी..

म्हारुगडेवाडी येथील 78 वर्षीय आज्जींचा 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. खरंतर त्यापूर्वी त्यांच्या 58 वर्षीय मुलाला कोरोनाचा लागण होऊन, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याने या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. पण आज कोरोनामुक्त झालेल्या या आज्जीबाईंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सर्वांना हात करत आणि सर्वांच्या टाळ्या स्वीकार करत त्या चालल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या जाण्याचे दुःख जरूर होतो, पण कोरोनाची यशस्वी लढाई जिंकल्याचा मनस्वी आनंदही प्रेरणा देणारा होता.

..अन चिमुकला खेळू लागला बाहुली संगे!

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 वर्षाच्या लहान बाळावर उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने अथक प्रयत्न करून या बाळाला आज कोरोनामुक्त केले. त्या मुलाला वॉर्डमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला डॉ. सुरेश भोसले यांनी बाहुली भेट दिली. जवळपास 15 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट असलेल्या या बाळाला बाहुली मिळाल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”