कराडच्या नगराध्यक्षांनी मानधनांचे 2 लाख 40 हजार लाटून भ्रष्टाचार केला : साैरभ पाटील यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी ओळखून नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी स्वतःचे मानधन व मिटिंग भत्ते पालिकेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याची उपसूचना विशेष सभेत मांडली होती. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेतूपुरस्कर उपसूचनेतील मानधन शब्द वगळून ठराव तसेच आपल्या अधिकाराचा वापर करून प्रोसेडिंग बनवले. नगराध्यक्षांनी सुमारे 2 लाख 40 हजारांचे मानधन लाटून त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केला.

नगरपालिकेत नगराध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीची माहिती देण्यासाठी बुधवारी 11 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, नगरसेविका पल्लवी पवार, अनिता पवार यांच्यासह आत्तार आंबेकरी, जयंत बेडेकर, सुहास पवार उपस्थित होते.

सौरभ पाटील म्हणाले, पालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात 15 मे रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कोरोना काळात केंद्र व राज्य शासनाकडे संभाव्य निधीची कमतरतेचा विचार करून त्यांच्याकडे निधीची मागणी करण्यापेक्षा आपली जबाबदारी ओळखून नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी स्वतःचे मानधन व मिटिंग भत्ते एप्रिल 2020 ते पंचवार्षिक कालावधी संपेपर्यंत पालिकेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याची उपसूचना जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी विशेष सभेत मांडली होती. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानुसार भाजपसह सर्व नगरसेवकांचे भत्ते पालिकेकडे वर्गही झाले. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेतूपुरस्कर उपसूचनेतील मानधन शब्द वगळून ठराव बनवला. तसेच आपल्या अधिकाराचा वापर करून प्रोसेडिंग बनवून सुमारे 2 लाख 40 हजारांचे मानधन लाटले आहे. एकीकडे त्या स्वतः नगरपालिका फंडात पैसे नाही म्हणतात. तर दुसरीकडे मात्र स्वतःच पैसे देत नाहीत, ही दुटप्पीपणाची भूमिका असून त्यांनी सर्व नगरसेवकांसह कराडकरांचा विश्वासघात केला आहे.

साैरभ पाटील पुढे म्हणाले, कराड शहराच्या एखाद्या हिताच्या विषयामध्ये एकवेळ त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसते; तरीही चालले असते. परंतु, त्यांनी असा खोटारडेपणा करायला नको होता. कराड नगरपालिका आत्तापर्यंत देश पातळीवर स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर होती. परंतु, ती आता भ्रष्टाचारातही पहिल्या क्रमांकावर आली असून दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनीच भ्रष्टाचाराचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असा टोला लगावत नगराध्यक्षांनी सन्मानाने सदरची रक्कम व्याजासह पालिकेच्या जनरल फंडात वर्ग करावी. तसेच त्यांनी कराडकरांसह सर्व नगरसेवक व सभागृहाचीही माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

साैरभ पाटील अभ्यासू वक्तव्य म्हणजे आमच्या कामाची पोचपावतीच

आम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून निवडूण आलो तेव्हा कोण सौरभ पाटील? ही नवीन पोरं काय करणार? यांना काय कळत! असे वक्तव्य विरोधकांकडून केले होते. मात्र, त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सौरभ पाटील हे अभ्यासू आहेत. त्यांनी पाठीमागच्या बजेटचा सखोल अभ्यास केला होता. हे त्यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे आमच्या कामाची पोचपावतीच असल्याचे मत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना गटनेते सौरभ पाटील यांनी व्यक्त केले.

Leave a Comment