कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पालिकेच्या शासकीय घरकुलात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तसेच गोपनीय कागदपत्रे पालिकेतून बाहेर जातातच कशी या मुद्द्यांवर कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
कराड नगरपरिषदेची शनिवारी सायंकाळी मासिक सभा आयोजित केली होती. यावेळी सभागृहात नगरसेवकांनी गोंधळ घातला.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावस्कर व भाजपा नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्यात सभेच्या सुरुवातीलाच विविध विषयांवर हमरीतुमरी झाली. नगरपालिकेच्या शासकीय घरकुलात काही कुटुंबे बेकायदेशीर राहत असल्याच्या मुद्द्यावरुन भाजपा नगरसेवकांनी भाजपाच्या नगराध्यक्षांना धारेवर धरलं. त्यामुळे अनेक दिवसांपासून भाजपमधील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यातील असलेली दुफळी उफाळून समोर आली.
नगरपरिषदेने झोपडपट्टीधारकांना मानलेल्या घरकुलात दोन कुटुंबे अनधिकृतरित्या राहत असल्याचे नगरसेवक विनायक पावस्कर यांनी सांगितले. यावर उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी दोन नव्हे तर पंधरा कुटुंबे अनधिकृतपणे घरकुला मध्ये वास्तव्य करीत असल्याचे समोर आणले. यावरुन भाजप नगराध्यक्ष आणि उपस्थित नगरसेवकांमध्ये चांगलीय खडाजंगी झाली.