आता आपत्ती आली तरी ‘नो टेन्शन’; कराड पालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा तयार

Karad Municipality disaster management plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांचे नियोजन केले जाऊ लागले आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने कराड शहराच्या आपत्ती व्यस्थापन आराखड्याबाबतची माहिती घेतल्यानंतर कराड पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार असून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आपत्ती परिस्थिती उदभवली तरी पालिकेकडून उपाययोजनांची तयारी करण्यात आली आहे.

कराड शहराला कृष्णा – कोयना नदींचा संगम लाभलेला आहे. या शहरात दरवर्षी पावसाळ्यात नद्यांना येणाऱ्या पुरामुळे पाणी शिरते. हे पाणी नदीकाठावरील भागातून शहरातील झोपडपट्टी , दुकानांमध्ये शिरल्यानंतर नुकसानही होते. शिवाय अनेक जीर्ण इमारती कोसळतात.

अशावेळी पावसाळ्यात होणारी हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा कामी येतो.कारण या आराखड्यामध्ये सर्व उपाययोजना असतात. या आराखड्यात पूर परिस्थितीत रेस्क्यू टीमसह प्रत्येक विभागाचा समावेश केला जातो. अशाच सर्व समावेशक असा आराखडा पालिकेकडून तयार करण्यात आलेला आहे.

पालिकेच्या आराखडा तयार असून आता अंलबजावणी व्हावी : पूर्व मुख्याधिकारी रमाकांत डाके

कराड शहराच्या आपत्ती व्यवस्थापनेच्या आराखड्यासंदर्भात पूर्वीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, माजी बदली होण्यापूर्वी मी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. तसेच शहरातील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसाही पाठविलेल्या आहेत. प्रामुख्याने शहरातील अग्निशमन दल, रेस्क्यू टीम, पोहणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर, नैसर्गिक आपत्ती काळात स्वयंसेवकांची काम करणारी टीम, बोटींची व्यवस्था आदींसह अनेक गोष्टींचा समावेश आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात करण्यात आला आहे.

आराखड्यानुसार संबंधित विभागांना सूचना : उपमुख्याधिकारी विशाखा पवार

उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, यापूर्वीचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पालिकेचा आराखडा तयार केला आहे. मात्र, त्यांची बदली झाल्यामुळे आता येणाऱ्या नव्या मुख्याधिकाऱ्यांकडून त्याची अंलबजावणी केली जाईल. आराखड्यातील समाविष्ट गोष्टींनुसार आम्ही संबंधित विभागांना त्यांच्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्या व कामे पार पाडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

शहरातील सर्वांनी आपत्तीच्या काळात एकत्रित यावे : माजी नगसेवक विजय वाटेगावकर

कराड शहराने यापूर्वीही पावसाळ्यातील पूर स्थिती अनुभवली आहे. ज्यावेळी शहरात महापूराचे पाणी आले होते. त्यावेळी सर्व सामाजिक संघटना, नगरसेवकांनी एकत्रित येत पुरतील नुकसानग्रस्तांची मदत केली होती. आता पालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा तयार करण्यात आला असला तरी सध्या पालिकेचा व शहराचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. आपत्ती काळात ठोस उपाययोजना व निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतले पाहिजे. आम्ही सर्व माजी नगरसेवक एकत्रितपणे येऊन शहरात आपत्तीच्या काळात सहकार्य करू, असे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.

धोकादायक इमारती उतरवण्याच्या पालिकेकडून नोटिसा

कराड शहरात अनेक जुन्या अशा धोकादायक इमारती आहेत. माती आणि दगडांच्यामी लाकडांच्या साह्याने बांधलेल्या इमारती पावसाळ्यात ढासळतात. त्यामध्ये पाणी शिरल्यास त्या कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा अनेक धोकादायक इमारती कराड शहरात आहेत. अशा इमारतींच्या मालकांना त्यांनी पावसाळा सुरु होण्यापूर्वी इमारती खाली कराव्यात अशा नोटिसा पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.