कराड प्रतिनिधी । शहरातील स्टॅण्ड परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा व कराड शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तौफिक अस्लम आतार (वय 36, रा. आंबेडकर चौक, मंगळवार पेठ, कराड), संजय ज्ञानू मस्के (वय- 55 रा. कराड), आकाश तानाजी धुमाळ (वय 28, रा. पोस्टल कॉलनी कार्वे नाका, शनिवार पेठ, कराड), आरिफ अब्दुलगणी शिकलगार (वय 38, रा. मंगळवार पेठ, कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरात सध्या अवैधरित्या कल्याण, मुंबई मटका व जुगार मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याची माहिती आयपीएस मीना साहेब यांना गोपनीय बातमीदाराकडून समजली. त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कराड शहर पोलिसांनी बुधवारी रात्री एसटी स्टॅण्ड परिसरातील पान टपरीवर छापा टाकला असता तेथे संजय म्हस्के हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता लोकांचेकडून पैसे स्विकारून मुंबई मटका नावाचा जुगार अल्ताफ पठाण यांचे सांगणेवरून चालवित असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 7 हजार 958 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. नवगृह मंदिराजवळ आरिफ शिकलगार हा देखील मुंबई मटका चालवित असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 26 हजार 795 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच आकाश धुमाळ हा देखील मुंबई मटका चालवित असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून 30 हजार 755 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जयवंत प्लाझा अपार्टमेंट जवळील पान टपरीमध्ये तौफिक आतार हा उमेश मुजावर याच्या सांगण्यावरून मुंबई मटका चालवित असताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 26 हजार 385 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी कराड एसटी स्टॅण्ड परिसरात चार पान टपऱ्यांवर कारवाई केली. त्यामध्ये 91 हजार 893 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.