फास्टॅग नसणाऱ्या वाहनांमुळे महामार्गांवर लांबच लांब रांगा; तासवडे टोल नाक्यावर वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी

कराड प्रतिनिधी । टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची मंगळवारी तासवडे (ता. कराड) येथील टोल संचालक, यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार फास्टॅग नसणाऱ्या अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला. परिणामी, त्यामुळे वाहनधारकांनी तासवडे टोलनाक्यावर आपल्या वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी केली होती. तसेच फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांमुळे टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

टोलनाक्यावरील कारभारात पारदर्शकता यावी तसेच वाहनधारकांचा टोलनाक्यावरील वेळ व इंधनाची बचत व्हावी यासाठी देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग लेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि त्यासाठी त्याची फेब्रुवारीपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊन फास्टँग बसविण्याबाबत वाहनधारकांत जागृती केली होती. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही अनेकांनी आपल्या वाहनांना फास्टँग बसविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मंगळवारपासून दुप्पट टोल वसूल करण्याच्या शासन निर्णयाची टोल व्यवस्थापन यंत्रणेने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

दुप्पट टोल वसुली प्रक्रियेमुळे वाहनधारक व टोल यंत्रणा यांच्यात वादावादीसह अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टोलनाक्यावर दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे फास्टँग नसणार्‍या अनेकांना निमुटपणे दुप्पट टोल भरावा लागला. दरम्यान फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना यापुढे कोणत्याही लेनमधून प्रवास करताना दुप्पट टोलचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वाहनधारकांनी कोणत्याही परिस्थितीत टोलनाक्यावरील आपला वेळ व इंधन वाचविण्यासाठी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावे, तसेच वाहनधारकांनी वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी आपला टँग अँक्टिव्ह असल्याचे पाहूनच टोलनाक्यावरुन प्रवास करावा असे आवाहन तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी केले आहे.

फास्टॅग नसणाऱ्या वाहनांचा प्रवास कराड शहरातून मसूर मार्गे
फास्टॅग नसल्याने तासवडे टोलनाका येथे दुप्पट टोलवसुली करण्यात येत होती. त्यामुळे टोलनाका चुकविण्यासाठी व दुप्पट टोल टाळण्यासाठी फास्टँग नसणारी वाहने कराड शहरातून मसूर मार्गे नेली जात होती. वाहनधारकांच्या या शक्कलीमुळे कराडच्या कृष्णा पूलावर मोठी गर्दी होवून ट्रॅफिक जाम झालेले होते.

You might also like