कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह विविध उपाय योजना प्रशासन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक तरिही मास्क न लावता फिरत असल्याने आता कराड पोलिसांनी अजब शिक्षा देणे सुरु केले आहे.
जर कोणी मास्क न घालता बाहेर फिरताना आढळला तर अंगातील शर्ट काढून तो तोंडाला लावायला पोलिस सांगत आहेत. पोलीस प्रशासनाकडून वारंवार मास्क लावायला सांगूनही, कारवाई करूनही नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. यावर मंगळवारी सायंकाळी तोंडाला मास्क न लावता फिरणार्यास मास्क नाही तर काढ शर्ट बांध तोंडाला अशी शिक्षा पोलिसांनी दिली.
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तेव्हा नागरिकांनी कोरोनाचे संकट गांभीर्याने घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवानही पोलीस करत आहेत.